स्व. मीनाक्षीताई स्मृती चषकाची मानकरी; जिल्हास्तरिय खुल्या स्पर्धेत अलिबागची बाजी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी विद्यार्थी संघटना, पुरोगामी युवक संघटना आणि सांस्कृतिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरिय खुली वक्तृत्व स्पर्धा शनिवारी (दि.3) अलिबागमधील शेतकरी भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अलिबागमधील संयोगी नाईक हीने प्रथम क्रमांक मिळवला असून, ती स्व. मीनाक्षीताई पाटील स्मृती चषकाची मानकरी ठरली. तत्पूर्वी, या स्पर्धेचे उद्घाटन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या स्पर्धेत एकूण 50 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी “आजचा विद्यार्थी आणि उद्याचा भारत”, “रायगडचा विकास आणि जनतेची अपेक्षा”, “सत्तेच्या सिंहासनावर नव्हे, जनतेच्या हृदयात घर करणारी ताई- मीनाक्षीताई”, “कलम जब जागती है तब सत्ता कांपती है”, “मजबुती का नाम महात्मा गांधी” आणि “जखमी लोकशाहीच्या कपाळावर आशेचे कुंकू लावतीय मी” अशा वेगवेगळ्या विषयांवर वत्कृत्व स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेकांनी वेगवेगळ्या विषयांवर आपल्या शैलीतून वत्कृत्व करून श्रोत्यांची मने जिंकली. परिक्षक म्हणून राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य भगवान लोखंडे, साहित्यिक लेखक आनंद कोळगांवकर, एमए विषयातील सुवर्ण पदकाचे मानकरी आणि मराठी भाषेवर प्रभूत्व असणाऱ्या सुरभी वाणी तसेच समिक्षक म्हणून प्रशांत कृष्णा पाटील यानी काम पाहिले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या अलिबागमधील संयोगी नाईक या विजेतीला 15 हजार 1 रुपये व चषक, द्वीतीय क्रमांक मिळविणाऱ्या अमिषा भगत यांना 11 हजार 1 रुपये व चषक, तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या जान्हवी हातमोडे यांना 7 हजार 1 रुपये व चषक, चतुर्थ क्रमांक मिळविणाऱ्या श्रवण कदम यांना 5 हजार 1 आणि चषक आणि पाचवा क्रमांक मिळविणाऱ्या सानिका घरत यांना 3 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच ध्रुव राऊत, पंकज पांडोळे, अपुर्वा पिंगळे, हिंदवी मोरे, प्रार्थना बेटकर या पाच जणांना उत्तेजनार्थ म्हणून 2 हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या सर्व विजेत्यांचा सन्मान शेकाप ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक, तालुका चिटणीस सुरेश घरत, रेवदंडा शहर चिटणीस निलेश खोत, पुरोगामी युवक तालुका प्रमुख विक्रांत वार्डे, निवेदक संदीप जगे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हा प्रमुख हर्ष ढवळे, तालुका प्रमुख वेदांत कंटक, वैशाली पाटील यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी विद्यार्थी संघटना, पुरोगामी युवक संघटना, सांस्कृतिक आघाडीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, स्पर्धक व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेसाठी अनेकांचे योगदान
ही वक्तृत्व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शेकाप पुरोगामी विद्यार्थी संघटना, पुरोगामी युवक संघटना, सांस्कृतिक आघाडीचे सर्व पदाधिकारी, सदस्यानी प्रचंड मेहनत घेतली. शनिवारी सकाळपासून सुरु झालेली ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याठी उत्तम नियोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, तालुका चिटणीस सुरेश घरत, संदीप जगे, निलेश खोत, अनिल शांताराम पाटील, अनिल गोमा पाटील आणि प्रणित गुरव यांनी मोलाचे योगदान दिले.
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या स्व. मीनाक्षी पाटील यांना वक्तृत्वाबद्दल एक वेगळी आवड होती. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रातील विषयांवर त्यांचा दांडगा अभ्यास होता. राजकारणात काम करीत असताना सर्वच पक्षामध्ये त्यांना आदराचे स्थान होते. मीनाक्षी पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा घेऊन त्यांना हीच खरी श्रद्दांजली वाहीली आहे. मीनाक्षी ताईंसारखे नेतृत्व भविष्यात कधीही होणे नाही. त्यांचे अभ्यास पूर्ण भाषण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचन करणे महत्वाचे आहे. पुस्तके वाचून विषय समजून घेणे आवश्यक आहे.
प्रदिप नाईक,
राज्य कामगार आघाडी प्रमुख, शेकाप
मीनाक्षी ताईंचे वत्कृत्व चांगले होते. साहित्यसह सर्व विषयांवर त्या सहज बोलत होत्या. प्रोत्साहन देणारे व्यक्तीमत्व होते. सर्व सामान्य व्यक्ती मोठे झाले पाहिजे, ही त्यांची भावना होती. मीनाक्षी ताईंची आठवण स्मरणात राहवी म्हणून त्यांच्या नावाने वक्तृत्व स्पर्धा घेऊन एक चांगले काम करण्यात आले आहे. अनेक वक्ते तयार करण्यासाठी अलिबागमध्ये राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. जिल्हासह राज्य पातळीवर या स्पर्धा घेऊन अनेक वक्ते निर्माण व्हावे.
द्वारकानाथ नाईक,
ज्येष्ठ नेते, शेकाप
