राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा शुभारंभ

। कर्जत । प्रतिनिधी ।

विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी महाविद्यालय चेंबूर-मुंबई येथील विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा कर्जत तालुक्यातील भोईरवाडी गावामध्ये शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरार्थी परिसरातील गावांमध्ये जाऊन जनजागृतीचे धडे ग्रामस्थांना देणार आहेत.

भोईरवाडी गावातील श्री मरीआई मातेच्या मंदिरात शिबिराच्या उद्घाटनाचा समारंभ आयोजित केला होता. विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शिधये यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. राजश्री हिर्लेकर, डॉ. रेश्मा पोरे, व्हेन्ना, सुरेश भोईर, पोलीस पाटील संदीप भोईर, संदेश भोईर, दिलीप लोहट आदी उपस्थित होते.

सात दिवसांच्या या शिबिरात व्यसनमुक्ती रॅली, आरोग्य शिबीर, शाळांना भेटी देऊन स्पर्धा परिक्षाबाबत मार्गदर्शन, पुस्तकांचे वाटप, महिलांसाठी स्तनाच्या कर्करोगाबाबत मार्गदर्शन, वेणगाव येथील श्रध्दा फाऊंडेशनला भेट देऊन मनोरुग्णांसाठी जागृती कार्यक्रम, कागदी पेपर बॅग बनवणे, प्लास्टिक प्रतिबंध अभियान, सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवन विद्या मिशनला भेट हे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी करणार असून रश्मी जोशी कचरा व्यवस्थापनावर कार्यशाळा घेणार आहेत.
याप्रसंगी उपसरपंच पूजा भोईर, नरेश भोईर, वसंत भोईर, सुजित भोईर, संजय कोर, गजानन भोईर, कृष्णा दास, रावजी भोईर, निलेश भोईर, सचिन लोहट, आदित्य भोईर, जनार्दन भोईर, शाहिद मुल्ला आदींसह महिला ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version