| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने प्रथमच संपूर्ण रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट आणि उदयोन्मुख महिला खेळाडूंसाठी टी ट्वेन्टी प्रीमियर लीग क्रिकेट
स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
गव्हाण उलवे येथील सुसज्ज असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ह्या महिला क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेला शुभारंभ करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील पुरुषांच्या बरोबरीने महिला क्रिकेट खेळाला चालना देण्याच्या उद्देशाने व भविष्यात रायगडच्या महिलांचा क्रिकेट संघ मजबूत करण्यासाठी ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी सांगितले. समीरा हॅबिटेटेस अलिबाग जेट्स संघ मालक सचिन राऊळ, खोपोली क्रिकेट असोसिएशन, संघ मालक यशवंत साबळे, अभि इलेव्हन अलिबाग संघ मालक अभिजीत तुळपुळे, चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी खारघर संघ मालक आकाश पटारिया अशा चार संघांचा समावेश स्पर्धेत करण्यात आला असून, स्पर्धा 28 मे ते 2 जून पर्यंत प्रथम साखळी व त्यानंतर बाद
फेरीनुसार आयोजित केली आहे. स्पर्धेत सहभागी महिला खेळाडूना आरडीसीएच्या वतीने रंगीत गणवेश देण्यात आला आहे. ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह असणार आहे. रायगड जिल्ह्यातील नामवंत महिला खेळाडू तसेच महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झालेल्या महिला खेळाडूंचा सहभाग ह्या स्पर्धेत असणार आहे.







