पनवेल न्यायालयाच्या आवारात वकिलावर हल्ला

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

पार्किंगच्या वादातून मारहाण

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल न्यायालयाच्या परिसरात पार्किंगच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना घडली. या घटनेत ॲड. जयसिंग जगन्नाथ शेरे (34) यांच्या गालावर कारच्या चावीला असलेल्या टोकदार व धारदार वस्तूने वार करून त्यांना जखमी करण्यात आले. याप्रकरणी दत्ता मोतीराम पिंगळे याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ॲड. जयसिंग शेरे हे गेल्या सहा वर्षांपासून पनवेल न्यायालयात वकिली व्यवसाय करीत आहेत. घटनेच्या दिवशी सकाळी ते न्यायालयाच्या आवारातील पोर्चमध्ये ॲड. ऋषीकेश बारटक्के यांच्यासोबत उभे होते. यावेळी न्यायालयासमोरील निल पार्क सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ पार्किंगच्या कारणावरून ॲड. राजवर्धन पाटील आणि एका अनोळखी व्यक्तीमध्ये वाद सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

वादादरम्यान संबंधित व्यक्तीने ॲड. राजवर्धन पाटील यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केल्याचे शेरे यांनी पाहिले. यावेळी शेरे, ॲड. ऋषीकेश बारटक्के आणि झेरॉक्स दुकानाचे मालक रोशन पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित व्यक्तीने शेरे यांना शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर धाव घेतली आणि कॉलर पकडून धक्काबुक्की केली. त्यानंतर कारच्या चावीला असलेल्या टोकदार व धारदार वस्तूने त्यांच्या उजव्या गालावर वार करून त्यांना जखमी केले.

घटनेनंतर निल पार्क सोसायटीचे पदाधिकारीही भांडण सोडविण्यासाठी पुढे आले. त्यानंतर जखमी शेरे आणि ॲड. राजवर्धन पाटील हे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी मदत देत दोन कर्मचाऱ्यांसह त्यांना पुन्हा घटनास्थळी पाठविले. त्यावेळी संबंधित व्यक्ती तेथेच कारसह उभी असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव दत्ता मोतीराम पिंगळे असल्याचे सांगितले.

दरम्यान, ॲड. शेरे यांनी उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे उपचार घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. न्यायालयाच्या परिसरातच वकिलाला मारहाण झाल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.

Exit mobile version