डंपरच्या धडकेत वकिलाचा मृत्यू

। पनवेल । प्रतिनिधी ।

खारघर उपनगरात भरधाव डंपरने दुचाकीस्वार तरुण वकिलाला चाकाखाली चिरडल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.4) सायंकाळी घडली. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रास्तारोको करत आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. काही तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी जमावाची समजूत काढत वाहतूक सुरळीत केली.

सीबीडी बेलापूरकडून सेंट्रल पार्कच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला. 28 वर्षीय महेश अशोक लोहार असे मृत वकिलाचे नाव असून, ते खारघरच्या सेक्टर 12 परिसरात राहत होते. सोमवारी सायंकाळी ते आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून घरी जात असताना राडारोडा वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरने त्यांना डंपरच्या मागील चाकाखाली चिरडले. या भीषण अपघातात महेश यांच्या अंगावरून डंपर गेल्याने ते जागीच ठार झाले तर डंपरच्या धडकेत त्यांचा मित्र उडवला गेला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि मृताच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनी घटनास्थळी गर्दी करत तीव्र संताप व्यक्त केला. काही वेळातच त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत रास्तारोको सुरू केला. यामुळे खारघरमधील उत्सव चौक ते अग्निशमन दलापर्यंत वाहतूक ठप्प झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्यासह वाहतूक शाखेचे अधिकारी व पोलीस दाखल झाले. त्यांनी संतप्त जमावाची समजूत काढत योग्य कारवाईचे आश्वासन दिले. अखेर सायंकाळी साडेसातच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले आणि वाहतूक पुन्हा सुरू झाली. दरम्यान, सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खारघरमध्ये याच मार्गावरून एका विवाह सोहळ्यासाठी येणार असल्याने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला वाहतुक कोंडी आणि अनुचित प्रकाराला सामोरे जावे लागू नये म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी या घटनेनंतर डंपरचालकाला ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांनी दिली. यापूर्वीही खारघर उपनगरात अशाच पद्धतीने एका जेष्ठ नागरिकाला अनोळखी वाहनाने उडवून त्यांना जखमी केले. या अपघातामध्ये जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. अजूनही ते अनोळखी वाहन पोलीस शोधू शकले नाहीत. स्मार्टसीटीतील रस्ते चकाचक असल्याने भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या गतिवर नियंत्रणासाठी स्मार्टयंत्रणा अजून विकसित करण्यात सरकारी यंत्रणा असफल ठरली आहे.

Exit mobile version