80 हजारांचा मुद्देमाल जप्त; रेवदंडा पोलीस कारवाईबाबत अनभिज्ञ
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
चौलमध्ये गावठी हातभट्टीचा धंदा राजरोसपणे सुरू असल्याची माहिती थेट स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेपर्यंत पोहोचते, एलसीबीचे पथक छापा टाकून 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करते; मात्र रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार सुरू असतानाही स्थानिक पोलिसांना त्याचा थांगपत्ता लागत नाही, हा प्रकार नेमका काय सांगतो? असा सवाल आता चौल परिसरातून उपस्थित होत आहे. या कारवाईनंतर रेवदंडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलीस अधीक्षक या प्रकाराची दखल घेणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अलिबाग तालुक्यातील चौलमध्ये अवैधरित्या गावठी हातभट्टीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानंतर पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक आशिष दहातोंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, पोलीस हवालदार रुपेश निगडे, पोलीस शिपाई प्रशांत लोहार, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री पाटील आणि अभियंती मोकल यांच्या पथकाने शनिवारी छापा टाकला. या कारवाईत सुमारे 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टी तयार करून दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे कारवाईत समोर आले. एलसीबीच्या पथकाने कारवाई करत या अवैध व्यवसायाला आळा घातला. मात्र, या कारवाईनंतर स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत. चौल परिसर रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. असे असताना अवैध हातभट्टीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती एलसीबीला मिळते आणि स्थानिक पोलिसांना त्याची माहिती नसते, यामागचे कारण काय? बीट पोलिसांकडून हद्दीत नियमित गस्त आणि माहिती संकलन केले जाते की नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
चौल परिसरातील अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवणे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे ही स्थानिक पोलिसांची जबाबदारी असताना एलसीबीला थेट कारवाई करावी लागल्याने रेवदंडा पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात संबंधित बीटवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागविला जाणार का, तसेच वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गडदे यांच्याकडे सध्या ठाण्याची जबाबदारी आहे. त्यांच्या हद्दीत अशा प्रकारचा अवैध व्यवसाय सुरू असल्याचे एलसीबीच्या कारवाईत समोर आल्याने स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, या कारवाईच्या पार्श्वभूमीवर रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इतर अवैध धंद्यांवरही वरिष्ठ पोलीस अधिकारी कारवाई करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
चोरट्यांना अभय, तक्रारदारांना त्रास?
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडीसह विविध गुन्हे घडत असतानाही त्यातील काही गुन्ह्यांची उकल अद्याप झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. चौलमधील दत्त मंदिरातील चोरीचा तपासही अद्याप प्रलंबित असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. घरफोडी अथवा चोरीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात जाणाऱ्या नागरिकांना योग्य वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. त्यामुळे “चोरट्यांना अभय आणि तक्रारदारांनाच त्रास?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रेवदंडा पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कथित मनमानी कारभारामुळे नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. या सर्व तक्रारींची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
