हजारो लिटर पाण्याची नासाडी; संभाव्य पाणीटंचाईवर प्रशासन निष्क्रिय
| रेवदंडा | प्रतिनिधी |
एकीकडे पावसाने दडी मारल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे सावट गडद होण्याची शक्यता निर्माण झाली असताना, दुसरीकडे मुरुड-गारंबी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी अक्षरशः वाया जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. नागशेत ते शिघ्रे दरम्यान जलवाहिनी फुटल्याने गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. मात्र, या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याऐवजी संबंधित पाणीपुरवठा विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पाणी जपण्याचे आवाहन जनतेला करायचे आणि दुसरीकडे सरकारी यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे पाण्याची नासाडी सुरू राहायची, हा कसला कारभार? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
यंदा पावसाने अपेक्षित सातत्य न राखल्याने पाणीसाठ्याबाबत चिंता वाढत आहे. एल निनोच्या संभाव्य प्रभावासह पावसातील खंडाचा विचार करता आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना, धरणातून नागरिकांपर्यंत पाणी पोहोचवणाऱ्या जलवाहिनीतच गळती सुरू राहणे ही बाब गंभीर मानली जात आहे. नागशेत-शिघ्रे दरम्यान फुटलेल्या जलवाहिनीतून किती पाणी वाया गेले, गळती नेमकी कधी सुरू झाली आणि ती अद्याप दुरुस्त का करण्यात आलेली नाही, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
उन्हाळा सुरू झाल्यानंतर पाण्याचे टँकर, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक, नागरिकांच्या तक्रारी आणि संभाव्य टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू होते. मात्र, पाणीटंचाईचे संकट उभे राहण्यापूर्वीच उपलब्ध जलस्रोतांचे संरक्षण करणे आणि पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी दूर करणे ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी नाही का? जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी वाया जात असताना संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित होते. तरीही अनेक दिवस गळती सुरू असल्याची नागरिकांची तक्रार असेल, तर संबंधित यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी नेमकी कोणती कार्यवाही झाली, संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली का आणि दुरुस्तीला विलंब होण्यामागचे कारण काय, याची स्पष्ट माहिती नागरिकांना मिळणे आवश्यक आहे.
नागशेत ते शिघ्रे दरम्यानच्या जलवाहिनीची तातडीने पाहणी करून गळती कायमस्वरूपी बंद करावी, पाण्याची नासाडी थांबवावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी नियमित देखभाल व तपासणीची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दुरुस्तीच्या कामाला प्राधान्य देणे गरजेचे आहे.
पाणी वाचवण्याच्या घोषणा कागदावरच?
पाणी हे सार्वजनिक संपत्ती असून, त्याचा अपव्यय रोखणे ही केवळ नागरिकांचीच नव्हे, तर शासन आणि संबंधित विभागांचीही जबाबदारी आहे. पाण्याची बचत करा, पाणी जपून वापरा, असे आवाहन वारंवार केले जाते. परंतु, प्रत्यक्षात जलवाहिनी फुटून पाणी वाया जात असेल आणि त्याकडे वेळेत लक्ष दिले जात नसेल, तर अशा आवाहनांचा उपयोग काय?
