रसायनीच्या धनंजय गीधची कामगिरी
सिनेमातील कथानकाला शोभेल अशी घटना
| रसायनी | वार्ताहर |
कोचीन ते गुजरात या ठिकाणी प्रोपोलीन हा अती ज्वलनशील गॅस वाहून नेणार्या टँकरचा तामिळनाडूमधील विजयमंगल या टोल नाक्याजवळ लिक झालेला सेफ्टी व्हॉल्व कुशलतनेे हाताळत पूर्ववत करीत रसायनीचे धनंजय गीध यांनी आपले कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखविले आहे.
एखाद्या सिनेमातील प्रसंगाला शोभेल अशी घटना नुकतीच घडली आहे.कोचिन ते गुजरात असा अति ज्वालाग्राही गॅस वाहून नेणार्या सेफ्टी टँकरचा व्हॉल्व लिकेज झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने स्वतःकडे सेफ्टी कीट असून देखील घाईत मोकळ्या हाताने लिकेज थांबवण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे त्याचे दोन्ही हात होरपळले.त्यातून लिकेज मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी त्याने स्थानीक सुरक्षा यंत्रणांना कळवले.मात्र ते लिकेज थांबवणे त्यांच्याही आवाक्या बाहेरचे होते. हा टँकर बालाजी ट्रान्स्पोर्ट कंपनीचा होता.त्या व्यवस्थापनाला रसायनीतील धनंजय गीध यांचा या बाबतीत गाढा अभ्यास असल्याचे ज्ञात होते. त्यांनी लागलीच धनजंय गीध यांना संपर्क करुन सर्व पाश्वर्र्भूमी सांगितली. लिकेजवर नियंत्रण न आणल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने त्यांची मदत लागणार आहे असे सांगीतले.
धनंजय गीध यांनी या स्पॉटवर लिकेज कंट्रोल करण्यासाठी आलेल्या सुरक्षा यंत्रणांना गीध यांनी मार्गदर्शन केले, मात्र त्यांना तितकीचे यश न आल्याने धनंजय गीध यांनीच प्रत्यक्ष त्याठिकाणी यावे यासाठी विनंती केली. एवठ्या लांब शेकडो किलोमिटर बाय रोड येण्याऐवजी धनंजय गीध यांना येण्याजाण्यासाठी विमानाच्या प्रवासाचा आणि इतर वाहनांचा बंदोबस्त केला गेला. या ऑपरेशनसाठी रसायनी मोहोपाडा येथून निघालेल्या धनंजय गीध यांच्या वाहनांला सर्व टोल नाक्यावरून लेन मोकळी ठेवण्यात आली. त्यांच्यासोबत असलेले सुरक्षा किट विमानातून नेण्यासाठी स्पेशल परमिशन देण्यात आली.
मुंबई ते कोईमतुर येथील विमान प्रवासानंतर विमानतळावरून स्पॉटपर्यंत त्यांना नेण्यासाठी स्पेशल गाडी आणि पोलीस बंदोबस्त दिला गेला होता. घटनास्थळी पोचल्यानंतर सर्व परिस्थिती जाणून घेऊन अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात तेही रात्रीच्या अंधारात धनंजय गिध यांनी तो लिकेज बंद केला. त्यांच्या या जबरदस्त कामगिरीवर तेथील सर्वच शासकीय आणि निमशासकीय यंत्रणा प्रभावित झाल्या.तेथील अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणांनी धनंजय गीध आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे आभार मानले आहेत. धनंजय गीध यांची त्यानी खास सोय करून त्यांना विशेष सर्टिफिकेट देऊन मानाने पुन्हा विमानतळापर्यंत सर्व व्यवस्था करून परतीच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि आभार मानले. या सर्व घटनाक्रमावरून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे धनंजय गिध हे या क्षेत्रातील हुकमी एक्का असल्याचे पुनश्च: एकदा सिद्ध झाले आहे.
कोईमतुर येथे जाऊन धनंजय गीध केलेल्या कामगिरीमुळे बराच वेळ बाधित झालेली तेथील वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले असून, तो टँकर पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला आहे. गंभीर परिणामकारक असलेली संभाव्य दुर्घटना टळल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे. या कामगिरीने फक्त अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे नव्हे तर खालापूर तालुका आणि रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची देखील मान उंचावली आहे. रोटरी क्लब ऑफ – पाताळगंगा, लायन्स क्लब ऑफ – खोपोली, खोपोली आणि खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार आणि अनिल विभुते, त्याच सोबत उप विभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला आणि खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांच्याकडून धनंजय गीध यांचे कौतुक होत आहे.