जिल्ह्यातील पानवल धरणाला गळती

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत माहिती उघड
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पानवल धरणाची दुरवस्था झाली असून, धरणाला 40 ते 50 टक्के गळती लागल्याची धक्कादायक माहिती पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुढे आली आहे.
शहराला नैसर्गिक उताराने (ग्रॅव्हिटी) पाणीपुरवठा करणारे हे एकमेव धरण असूल, शिळ धरणापाठोपाठ शहराला पाणीपुरवठा करणारे हे दुसरे धरण आहे. पावसाळा आणि निम्म्या उन्हाळ्यात शहराला पाणीपुरवठा करण्यामध्ये या धरणाचा मोठा वाटा आहे. शिळ धरणाचा पाणीसाठा त्यामुळे काही महिने स्थिर राहातो. हे धरण बांधल्यापासून आजपर्यंत पानवल धरणातील गाळ काढण्यात आलेला नाही किंवा त्याची मोठी दुरुस्तीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता या धऱणाला सुमारे 50 टक्के गळती लागली असल्याची माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी आजच्या सर्वसाधारण सभेत दिली.
यापूर्वी या धरणाची मुख्य जलवाहिनी बदलण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे 25 ते 30 लाखाहून अधिक खर्च करण्यात आला आहे. धरणाची दुरुस्ती झाली तर ठीक नाही तर जलवाहिनीचा काहीच फायदा होणार नाही. हा खर्च फुकट जाईल, असे साळवी यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय, या धरणाच्या दुरुस्तीचा ठराव करून पाटबंधारे विभागा याचा प्रस्ताव तयार करणार आहे. मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून या धरणाच्या दुरुस्तीला भरीव निधीची मागणी करू, असे नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी सांगितले. सभागृहात एकमताने तसा ठराव घेण्यात आला.

Exit mobile version