मोफत मुलीच्या वाढदिवशी मिनी अंगणवाडीची स्थापना
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील ताडगाव ग्रामपंचायत हद्दीतील दुधनी येथे नुकतीच मिनी अंगणवाडीची स्थापना करण्यात आली. येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन साठे यांनी प्रशासनाची वाट न पाहता आपली मुलगी स्वरांजली ज्योती सचिन साठे हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मिनी अंगणवाडीची सुरुवात केली. त्यामुळे आता येथील लहानग्यांचे शिकणे सुकर व मोफत झाले आहे.
येथील सचिन साठे व केतन साठे यांच्या संकल्पनेने ही अंगणवाडी स्थापन झाली आहे. या गावात ठाकूर समाजातील लोक कित्येक वर्षापासून राहत आहेत. भारत स्वातंत्र्य होऊन 76 वर्ष झाली तरी या गावामध्ये अंगणवाडी नव्हती. यासाठी ग्रामपंचायतीमधून आणि गावकऱ्यांकडून अंगणवाडीसाठी प्रशासनाकडे अर्ज विनंत्या करून पाठपुरवठा केला होता, परंतु त्याची वाट न पाहता अंगणवाडी सुरु केल्याचे साठे यांनी सांगितले. या अनोख्या उपक्रमासाठी स्वरदिव्य वेल्फेअर फाऊंडेशन आणि ताडगाव सरपंच करुणा साठे यांची मदत लाभली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वर दिव्य वेल्फेअर फाउंडेशनचे डायरेक्टर दिलीप सोनुने, ताडगाव सरपंच करुणा साठे, उपसरपंच संजय चौधरी, सदस्य मंगेश देशमुख, रघुनाथ घारे, कृषी अधिकारी निरगुडे, माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ताडगाव ग्रामपंचायतीमधील नागरिक उपस्थित होते.
अशी झाली पायाभरणी
सर्व प्रथम चंद्रा मालु शीद यांच्या मदतीने दुधनी गावातील 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांचा सर्वे केला गेला. त्यानुसार जवळपास 29 मुले-मुली आहेत. जी प्राथमिक शिक्षणापासून वंचित असल्याचे आढळले. त्यानंतर अंगणवाडी कुठे भरवायची याचा विचार केला, तर दुधनी गावकऱ्यांनी एकजुटीने एकत्र येऊन दुधनी गावातील समाज मंदिरामध्ये अंगणवाडी सुरु करा असे सांगितले.
ज्ञानकण गिरवणार
अंगणवाडीमुळे मुलांना शब्दांची, अंकांची, गाणी आणि गोष्टींची ओळख व्हावी, शिकणे व खेळणे व्हावे, यासाठी शिक्षिका म्हणून कौशल्या तुषार मेंगाळ यांची निवड सर्व दुधनी गावकऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली. कौशल्या मेंगाळ या ताडगाव अंगणवाडी शिक्षिका करीना भिमचंद्र शिद यांच्या मार्गदर्शनाखाली जोपर्यंत प्रशासनाकडून अंगणवाडी मंजूर होत नाही तोपर्यंत अंगणवाडीचा कार्यभार पाहणार आहेत.