संबंधित विभागाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष
| नेरळ | प्रतिनिधी |
मराठी शाळा टिकाव्यात, गुणवत्ता वाढावी अन् मुलांची संख्याही वाढावी, याकरिता शासनाने पुढाकार घेतला. मात्र, जिल्हा परिषदेच्या कर्जत तालुक्यातील नांदगाव शाळेला अनेक वर्षांपासून गळती लागली आहे. अशा परिस्थितीत मुलांना शिक्षण घ्यावे लागत आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासन, स्थानिक शालेय व्यवस्थापन, मुख्याध्यापक यांनी वारंवार कर्जत पंचायत समिती, सर्व शिक्षा अभियान तसेच शिक्षण विभागाकडे अर्ज केले आहेत. तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी या शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली नसल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.
कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीमधील नांदगाव येथील रायगड जिल्हा परिषदेची शाळा गळकी बनली आहे. षटकोनी पद्धतीत एकच इमारत असून, पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असलेली शाळा आहे. त्या ठिकाणी सर्व शिक्षा अभियानामधून 2012 मध्ये बांधलेली षटकोनी इमारती बहुसंख्य ठिकाणी गळक्या निघाल्या आणि त्यामुळे षटकोनी आकाराच्या बहुसंख्य शाळा इमारती या बंद आणि कालबाह्य झाल्या आहेत. मात्र, नांदगाव येथील शाळेची इमारत अनेक वर्षे पावसाळ्यात गळकी असूनदेखील तेथे जिल्हा परिषदेने नवीन वर्गखोल्या बांधून दिलेल्या नाहीत. त्यामुळे तेथील विद्यार्थी हे पावसाळ्यात आपल्या अंगाखांद्यावर आणि पुस्तकांवर पावसाच्या पाण्याचे पडणारे थेंब यांच्यामध्ये बसून शिक्षण घेत आहेत. मात्र, त्याबाबत ग्रामपंचायत प्रशासन तसेच स्थानिक शालेय व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापक यांच्या अर्जांवर कोणतीही कार्यवाही कर्जत पंचायत समिती, सर्व शिक्षा अभियान तसेच शिक्षण विभागाने केलेली नाही.
या शाळेमध्ये 86 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हा परिसर महाराष्ट्र्र शासनाने आदिवासी जाहीर केला आहे. या परिसरात विकासकामे करण्यासाठी आदिवासी विकास विभाग तसेच शासनाचे अन्य सर्व प्रकारचे अतिरिक्त निधी मिळत असतात. मात्र, नांदगाव येथील शाळेची इमारत दहा वर्षांपासून पाण्याची गळती सुरु असतानादेखील त्याकडे शिक्षण विभागाने केलेले दुर्लक्ष निश्चितच सर्व यंत्रणेला विचार करायला लावणारे आहे. मात्र, आता स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे मागणी केल्याने ग्रामपंचायतीकडून त्या शाळेच्या इमारतीला प्लास्टिक आवरण टाकण्याचे काम सुरु केले आहे. हे सर्व गेली दहा वर्षे सुरु असूनदेखील त्या गळक्या पाण्यावर तोडगा काढण्यात आला नव्हता.