आतापर्यंत 89 कोटींचे कर्ज मंजूर; 83 कोटी रुपयांचे कर्ज वितरण
| अलिबाग | प्रमोद जाधव |
कोरोनामुळे बेरोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यातील बेरोजगार तरुण व्यवसायाकडे वळू लागले आहेत. या तरुणांना मुद्रा योजनेंतर्गत येणाऱ्या शिशू, किशोर व तरुण कर्ज योजनेला आधार मिळाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे व जिल्हा अग्रणी बँकेच्या पुढाकाराने एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील बँकांनी 8 हजार 900 बेरोजागारांना व्यवसायासाठी 89 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले असून, त्यापैकी 83 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात बँकांना यश आले आहे.
मागील दोन वर्षे कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले होते. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले. या लॉकडाऊनचा फटका अनेकांना बसला. त्यामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले. नोकऱ्या गेल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. त्याची झळ लहान-मोठ्या उद्योजकांसह मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त असलेल्या रायगड जिल्ह्यातील नागरिकांनाही बसला. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी अनेक बेरोजगार तरुणांनी प्रयत्न सुरु ठेवले. शहरात नोकरी करण्यापेक्षा आपल्या कौशल्याचा उपयोग व्यवसायातून करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गावांमध्ये लहान-मोठे व्यवसाय सुरु करण्याची धडपड सुरू झाली. जिल्ह्यातील बँकांनीदेखील ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांना कर्ज देण्याचा प्रयत्न सुरु केला. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी शिबीर घेऊन योजनांची माहिती देऊन व्यवसाय करण्यासाठी प्रेरित केले. त्याचा परिणाम रायगड जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने दिसून येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे व जिल्हा अग्रणी बँकेच्या पुढाकाराने एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील बँकांनी 8 हजार 900 बेरोजागारांना व्यवसायासाठी कर्ज दिले आहे. मुद्रा योजनेंतर्गत लघु व सूक्ष्म व्यावसायिकांना बळकट करण्यासाठी शिशू, किशोर व तरुण कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनांच्या माध्यमातून 89 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. 83 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात बँकांना यश आले आहे. त्यात शिशु कर्ज योजनेच्या माध्यमातून 6 हजार 265 या लहान व्यावसायिकांना 50 हजार रुपयांपर्यंत 20 कोटी 36 लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. किशोर कर्ज योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत दोन हजार 238 मध्यम व्यावसायिकांना 38 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज वितरीत केले आहे. तसेच तरुण कर्ज योजनेद्वारे मोठ्या 396 व्यावसायिकांना 30 कोटी 40 लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. या कर्जातून लघु, सूक्ष्म व मोठ्या उद्योजकांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न केल्याने या उद्योजकांना कर्जाचा आधार मिळाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.
रायगड जिल्ह्यात मुद्रा योजनेंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या योजनेंतर्गत हजारो व्यावसायिकांना कर्ज वितरीत केलेे आहे. मुद्रा योजनेसह अन्य योजनांमार्फत मिळणाऱ्या कर्जाचा नागरिकांनी लाभ घ्यावा. जिल्ह्यातील बँका नेहमी व्यावसायिकांना उभारी देण्याचा प्रयत्न करीत आहे.
विजय कुलकर्णी, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक, बँक ऑफ इंडिया
व्यावसायिकांना आधार
शिशु कर्ज योजनेच्या माध्यमातून 6 हजार 265 या लहान व्यावसायिकांना 50 हजार रुपयांपर्यंत 20 कोटी 36 लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. किशोर कर्ज योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत दोन हजार 238 मध्यम व्यावसायिकांना 38 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज वितरीत केले आहे. तसेच तरुण कर्ज योजनेद्वारे मोठ्या 396 व्यावसायिकांना 30 कोटी 40 लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे.