| श्रीवर्धन | वार्ताहर |
महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालय, श्रीवर्धन येथे बँकिंग परीक्षा या विषयांवर ऑनलाईन पद्धतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील डॉ. विठ्ठल कावेरी (माजी प्राध्यापक आणि अधिष्टता NIBM, पुणे) उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पांडुरंग राणे होते. तसेच या कार्यक्रमाचे संयोजन व प्रास्ताविक महाविद्यालयातील प्रा. डॉ. योगेश लोखंडे यांनी केले.
विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना डॉ. विठ्ठल कावेरी म्हणाले की, मुलींनी बँकिंग क्षेत्राकडे अधिकाधिक सहभाग घ्यायला हवा, कारण ग्रामीण किंवा निमशहरी भागातील मुलींना बँकिंग क्षेत्रात काही जागा राखीव असतात, त्याचा फायदा मुलींनी घ्यायला हवा व तसेच प्रोबेशनरी ऑफिसर, क्लार्क आणि प्रादेशिक ग्रामीण बँक व सहकारी बँक इत्यादी परीक्षांचा किमान सहा महिन्यांमध्ये अभ्यास करून मुलींना या पोस्ट मिळवणे शक्य आहे, यासाठी त्यांनी खासगी शिकवणी वर्ग लावण्याची गरज आहे.
यावेळी ते म्हणाले की, ही परीक्षा दोन टप्यात होत असून, त्यामध्ये लेखी परीक्षा देताना गणित, इंग्रजी व्याकरण, तर्कशास्त्र परीक्षा, जलद अवगत ज्ञानाचे आणि कमी वेळेत उत्तर देण्याची कला अवगत असणे अपेक्षित आहे. यानंतर दुसरा टप्पा म्हणजे मुलाखत पद्धती होय. यामध्ये संभाषण कौशल्य, प्रामाणिकपणा तसेच यामध्ये स्थानिक आणि देशातील मोठ्या घडामोडींवरसुद्धा प्रश्न विचारले जातात. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय पांडुरंग राणे यांनी विद्यार्थिनींनी बँकींग क्षेत्राकडे का वळावे याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहा. प्राध्यापक डॉ. योगेश लोखंडे यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.