आयोगाविरोधात डावे पक्षही रस्त्यावर उतरणार

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

1 नोव्हेंबरच्या मोर्चात सहभागी होण्याचा एकमताने निर्धार

| मुंबई | प्रतिनिधी |

सदोष मतदारयाद्या दुरुस्त करून अद्ययावत केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, या मागणीकरिता येत्या 1 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याविरोधात महाविकास आघाडी-मनसेने विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या राज्यातील डाव्या पक्षांनीही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या फोर्ट येथील कार्यालयात पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, दि. 25 नोव्हेंबर रोजी डाव्या पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली, या बैठकीत राज्यव्यापी प्रचार मोहीम राबवून या मोर्चात मोठ्या संख्येने भागीदारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीला जयंत पाटील यांच्यासह प्रा. एस.व्ही. जाधव आणि ॲड. राजेंद्र कोरडे (शेतकरी कामगार पक्ष), कॉम्रेड शैलेंद्र कांबळे (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), कॉम्रेड प्रकाश रेड्डी (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), कॉम्रेड किशोर ढमाले (सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष), कॉम्रेड श्याम गोहिल आणि कॉम्रेड दत्तू अत्याळकर (सीपीएल-एमएल, लिबरेशन), कॉम्रेड किशोर कर्डक (फॉरवर्ड ब्लॉक) हे डाव्या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कॉम्रेड डॉ. भारत पाटणकर (श्रमिक मुक्ती दल) आणि इतर अनेक डाव्या पुरोगामी पक्ष संघटनांनी या भूमिकेला पाठिंबा दर्शवून मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे कळवले आहे. दरम्यान, मतदार याद्यातील दुबार नावे, इतर ठिकाणची घुसडलेली नावे, अस्तित्वात नसलेले आणि अपूर्ण पत्ते, वय आणि लिंगातील तफावती, मतदार यादीत फोटो नसणे, तसेच मागील वर्षभरापासून वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांना सरसकट मताधिकार नाकारणे, या आणि अशा प्रकारच्या अनेक दोषांनी सदोष झालेल्या मतदार याद्यांचा वापर करून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे म्हणजे लोकशाहीची घोर थट्टा आहे. संविधानाने दिलेल्या अमूल्य अशा मताधिकारावर दिवसाउजेडी घातलेला दरोडा आहे. राज्य आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यंनी निवडणूक यंत्रणांना हाताशी धरून ही निवडणूक एकतर्फी करण्याचा कट आखला आहे, आणि म्हणूनच मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय निवडणूक नको, ही भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम या मोर्चाच्या तयारीकरीता राबविण्यात येणाऱ्या राज्यव्यापी प्रचार मोहिमेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Exit mobile version