विधान परिषद निवडणूक बिनविरोध

10 जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात

| मुंबई | प्रतिनिधी |

महाराष्ट्र विधान परिषदेच्या दहा जागांसाठीची निवडणूक यंदा बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नियमित 9 जागा आणि 1 पोटनिवडणूक अशा एकूण 10 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मात्र, कोणत्याही पक्षाने अकरावा उमेदवार न दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 12 मे रोजी मतदान होणार होते. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान आणि त्याच दिवशी निकाल जाहीर होणार होता. मात्र, सद्यःस्थितीत सर्व दहा उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यांच्याकडे आवश्यक दहा आमदारांचे सूचक नसल्याने त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्य लढत होण्याआधीच निकाल स्पष्ट झाला आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार पक्षनिहाय जागावाटप भाजप 6 जागा, शिवसेना (शिंदे गट) 2 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 1 जागा, महाविकास आघाडी (शिवसेना ठाकरे गट) 1 जागा. दरम्यान, भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, प्रज्ञा सातव, शिवसेना शिंदे गटाकडून नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी, महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Exit mobile version