। अलिबाग । प्रतिनिधी ।
नागावमधून पसार झालेला बिबट्या आता आक्षी येथील साखर परिसरात असल्याचे उघड झाले आहे. या परिसरातील दोघांवर शुक्रवारी सकाळी बिबट्याने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर वन विभागाला पाचारण केले. मात्र, दोनच वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. साखर गावात जेट्टीवर बिबट्या असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहवे असे आवाहन करण्यात येत आहे .
सतर्क रहा- रश्मी पाटील
आक्षीमधील साखर परिसरात बिबट्या आला असून त्याने दोघांवर हल्ला केला आहे. आनंद निषाद व लोकेश असे जखमींची नावे आहेत. सध्या बिबट्याचा वावर साखर जेट्टी परिसरात आहे. वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कोलाडसह पुणे येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. नागरिकांनी सतर्क राहवे. घराबाहेर पडू नका. स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन सरपंच रश्मी पाटील यांनी केले आहे.







