। नेरळ । प्रतिनिधी ।
बिबट्या आले रे, सावध रहा, अशी हाकाटी आता वनविभागाने कर्जत तालुक्यातील नागरिकांना दिली आहे. शिरसे गावातील शेतकर्याच्या जंगलात चरायला गेलेल्या गायीची शिकार केली गेली होती. त्यांनतर दोन दिवसांनी कर्जत कोंडीवडे राज्य मार्ग रस्त्यावर स्थानिक रहिवाशी सुनील गायकवाड यांनी बिबट्या सदृश प्राणी रस्त्यावरून फिरताना पाहिला आहे.दरम्यान,या सर्व घटना लक्षात घेऊन वन विभागातर्फे सतर्क राहण्याचे सूचना स्थानिक परिसरात दवंडी पिटवून देण्यास सुरुवात झाली आहे.मात्र बिबट्या आपल्या भागात आहे या केवळ चर्चेने स्थानिकांची झोप उडाली आहे.
कोंदीवडे येथे राहणारे सुनील बबन गायकवाड हे आपल्या वाहनाने कर्जत येथील कामे उरकून घरी परतत होते. त्यावेळी शिरसे गावाच्या अलीकडे असलेल्या शिरसाई देवीच्या मंदिराच्या लहानशा वळणावर बिबट्या रस्त्याच्या कडेने जात होता. गाडीचा प्रकाश त्यांच्यावर पडल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या जंगलाकडे गेला.या बद्दल गायकवाड यांनी वन विभाग कर्जत पश्चिमचे वन क्षेत्रपाल यांच्या कार्यालयास कळविले.
त्यानंतर वन विभागाने दुसर्या दिवशी सकाळी त्या भागात पाहणी केली असता बिबट्या सदृश प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले होते.त्यामुळे वन विभाग कडून परिसरात रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्या असून घरातून जंगलात जनावरे यांना चारा शोधायला सोडू नये असे देखील सांगण्यात आले आहे.
शेतकर्यानी आपली जनावरे जंगलात सोडू नये आणि प्रामुख्याने रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये. बिबट्या सदृश प्राणी दिसल्यास तत्काळ वन विभागला कळवावे.तर सातत्याने बिबट्याचा वावर या भागांत आढळून येत असल्याने आम्ही पनवेल येथील उप विभागीय कार्यालयात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा द्यावा अशी मागणी करीत आहोत.
समीर खेडेकर, वन क्षेत्रपाल