टॅक्सी चालकाने केले मोबाईल मध्ये चित्रित; वन विभाग सतर्क
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान आणि पायथ्याशी असलेल्या वन क्षेत्रात वन्यजीवांचे वास्तव्य असल्याच आढळून आले आहे. मंगळवारी (दि.14) रात्री माथेरान घाट रस्त्याने प्रवास करणारा बिबट्या अनेकांचे नजरेस पडला. ह्या बिबट्याला टॅक्सी चालकाने आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केल्याने बिबट्याचा वावर माथेरान जंगलात आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे. दरम्यान, बिबट्याच्या दर्शनाने वन विभागाने स्थानिक रहिवाशी यांना सतर्क राहावे अशी सूचना करण्यास फलकबाजी सुरू केली आहे.
माथेरानच्या डोंगरात सातत्याने बिबट्याचा वावर आढळून आला आहे. यावर्षी जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात माथेरान डोंगरातील वाड्यांमध्ये बिबटे पोहचले होते. त्याचवेळी कुंभे आंबिवली भागात देखील त्यांचा वावर दिसून आला होता. त्यावेळी माथेरान -नेरळ आणि कर्जत पश्चिम वन विभागाच्या दुरशेत्र कार्यालय यांच्याकडून स्थानिक लोकांच्या गाव बैठका घेण्यात आल्या होत्या, त्यात सूचनांचा पाऊस पडला होता. मात्र, अनेकवेळा बिबट्याचे दर्शन तसेच वहिवाट दिसून आल्यानंतर त्या बिबट्यांकडून कोणताही धोका उद्भवला नव्हता. मागील एक महिन्यात कुठेही बिबट्याचा वावर दिसून आला नव्हता.
14 एप्रिल रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास माथेरान घाटात मुख्य रस्त्याने बिबट्याची धावपळ सुरू होती. त्यावेळी माथेरान येथील रहिवाशी असलेले टॅक्सी चालक महेंद्र जाबरे हे प्रवासी घेऊन नेरळ स्टेशनकडे येत होते. त्यावेळी गार्बेट रस्त्याच्या बाजूला ह्या बिबट्याचे दर्शन झाले आणि त्यावेळी गाडीच्या हेड लाईट मधून पुढे- पुढे जाणाऱ्या बिबट्याला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करता आले. पुढे हा बिबटा सिमेंट कठडा चढून गार्बेट वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खाली उतरला. काही दिवस आधी एका पर्यटकाला त्यांच्या दुचाकी समोरून बिबट्याला रस्ता ओलांडता आढळून आला होता. ही घटना काही तासात जगभर पोहचली आहे.
वन विभागाने आज सकाळ पासून बिबट्याच्या अस्तित्वाचे पाऊलखुणा मिळतात का? हे पाहण्यासाठी माथेरान घाटात शोध मोहीम सुरू केली. तर स्थानिक टॅक्सी चालक यांना बिबट्याचा वावर दिसून आल्याने वन विभागाने खबरदारी म्हणून गावोगाव गावबैठका घेण्यास सुरुवात केली आहे. वन विभागाने बिबट्या दिसल्यानंतर काय करावे? याबाबत सूचना देणारे फलक देखील लावण्यास सुरुवात केली आहे. त्यात बिबट्याचे प्रवास ज्या बाजूने झाला तो भूभाग नेरळ- माथेरान वनक्षेत्रपाल यांच्याकडील तर बिबट्याने पुढे प्रवास ज्या गार्बेट गाडीकडे जाणाऱ्या रस्त्याने केला तो भूभाग कर्जत पश्चिम वनक्षेत्रपाल यांच्या कडील आहे. त्यामुळे दोन्ही दुरक्षेत्र विभागाचे अधिकारी यांनी जंगल परिसरात जाऊन पाहणी करण्यास सुरुवात केली आहे.
मी प्रवासी घेऊन नेरळ कडे जात होतो. गाडी पहिला टर्न उतरत असताना गाडीच्या हेड लाईट मध्ये प्राणी धावत असताना दिसून आला. उतार असल्याने गाडीचा वेग जास्त होता आणि त्यामुळे काही सेकंदात बिबट्या समोरून आमची गाडी जाऊ लागली. बिबट्याचा वावर आमच्या अनेक टॅक्सी चालक यांना दिसून आल्याने आम्ही लगेच आपल्याकडील मोबाईल मध्ये तो क्षण चित्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, साधारण 50 मीटर रस्त्याने जात पुढे त्या बिबट्याने गार्बेट रोड कडे जाणाऱ्या कठड्यावर उडी मारली आणि खाली उतरला. त्यावेळी काळोख असल्याने आणि गाडी मध्ये पर्यटक प्रवासी असल्याने प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही खाली आलो.
महेंद्र जाबरे
टॅक्सी चालक
माथेरान जंगल आणि पायथ्याशी असलेल्या जंगलात बिबट्याचे अस्तित्व दिसून येत आहे. ही बाब जंगलासाठी चांगली आहे. पण त्या प्राण्याकडून कोणालाही धोका पोहचू नये यासाठी आम्ही सर्वांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
समीर खेडेकर
वनक्षेत्रपाल कर्जत पश्चिम
निलेश खेडेकर
माथेरान जंगलात धसवाडी, जुम्मापट्टी, बेडिसगाव येथे बिबट्याचे दर्शन होत असते. त्यामुळे आम्ही सतत बिबट्याचा वावर दिसून आल्यास कोणती खबरदारी घ्यावी यांची माहिती दिलेली आहे.
वनक्षेत्रपाल
नेरळ -माथेरान









