। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग- पेण मार्गावरील कार्लेखिंडीत सायंकाळी सहाच्या सुमारास बिबट्या दिसल्याचे या मार्गावरुन नेहमी प्रवास करणार्या भैरवी पाटील यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिसरात दहशत पसरली आहे. रायगड जिल्ह्यातील वरंध घाट, तळा, पाली आदी ठिकाणी बिबट्याची मुक्त संचार असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे.
अनेकदा त्याचा संबंध अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड सोबत लावण्यात आला होता. मात्र बुधवारी (दि. 22) सायंकाळी सहाच्या सुमारास भैरवी पाटील यांनी प्रत्यक्ष बिबट्या पाहिल्याने कार्लेखिंडीतही बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे.
परिणामी, वन विभागाने याबाबत योग्य तो तपास करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याशिवाय काही प्रत्यक्षदर्शी वाहन चालकांनी बिबट्या पाहिल्याने या मार्गावरुन प्रवास करणार्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.