सहा महिन्यात सहा गुरे, एका कुत्र्याला केले ठार
| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा तालुक्यात वनराईने नटलेल्या निसर्गरम्य देहन, मोरवणे, वांगणी गाव परिसरात जंगली श्वापदे आणि पशुपक्षांची नेहमीच रेलचेल असते. रोहा परिक्षेत्र म्हसळा वन विभागांतर्गत मोठ्या प्रमाणात वन जमीनीवर घनदाट जंगल आहे. देहन येथे तालुका कृषी विभागाची मोठी नर्सरी असल्याने येथील घनदाट झाडीने देहन, वांगणी गाव परिसरामध्ये बारमाही नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत वाहताना पाहायला मिळतात. जंगली श्वापदांना पोषक वातावरण असल्याने येथील जंगल क्षेत्रात बिबट्याचा वावर आहे.
बिबट्या अधुन मधून मोरवणे, देहन, पाष्टी, वांगणी येथील शेतकऱ्यांच्या गुरांवर हल्ला करून गोधनाचे नुकसान करीत असतो. मे महिन्यापासून मोरवणे गावात दोन शेतकऱ्यांच्या गोठ्यात बांधलेली तीन वासरे, वांगणी येथे शेतघरातील पाळीव कुत्रा, अशोक नाईक यांच्या मालकीचा बैल, मोरवणे गावाचे राजा गायकर यांच्या मालकीची गाय तर वांगणी येथील विश्वास नाईक यांच्या गोठ्यातून सहा महिन्याचे वासरू बिबट्याने ठार केल्याचे निदर्शनास आले आहे. वरील घटनांची नोंद म्हसळा तालुका वनविभाग कार्यालयात करण्यात आली असून 4 शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई देण्यात आली असल्याचे अशोक नाईक यांनी माहिती देताना सांगितले. बिबट्या नेहमी वांगणी, मोरवणे येथे पाळीव जनावरांवर हल्ला करून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान करीत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील परिसर रहदारीचा असल्याने रात्री अपरात्री लोकांची ये-जा असते. कालांतराने बिबट्या माणसावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने रोहा परिक्षेत्र म्हसळा वन विभागाने लागलीच दखल घेऊन परिक्षेत्र वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांनी बिबट्याचा योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.







