। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यातील देवघर कोंड, कुडतुडी, कोळे, आडी, पाष्टी आणि इतर भागात बिबट्याचा वावर असल्याचे या परिसरातील ग्रामस्थांनी प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगण्यात आले. शनिवार, दि.18 मार्च रोजी चक्क भरदुपारी साडेचारच्या सुमारास देवघर कोंड परिसरात कुडतुडी रस्त्यावर काही जणांना दोन बिबटे रस्त्यावर शिकारीच्या शोधात असल्याचे दिसले. अत्यंत भयभीत अवस्थेतील या नागरिकांनी कसाबसा जीव वाचविण्याचा प्रयत्न करून जवळचे देवघरकोंड गाव गाठले. ही बातमी वार्यासारखी संपूर्ण तालुक्यात पसरली.
खबरदारीचा इशारा म्हणून वनपाल चिंचोडा, प्रवीण वसंत शिंदे सरपंच, या परिसरातील ग्रामस्थ यांची भेट घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून सतर्क राहण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे एकटे-दुकटे न फिरण्याबाबत विनंती करून सर्वांनी आपापली गुरेढोरे गोठ्यामध्ये व्यवस्थित आणि काळजीपूर्वक बांधण्याचेही आवाहन केले. ही बाब वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांना कळवून योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन प्रवीण शिंदे यांनी दिले.