| चिरनेर | दत्तात्रेय म्हात्रे |
उरण तालुक्यातील चिरनेरच्या जंगलात, पुरणाच्या खोंड्यात बिबट्या आला असल्याच्या चर्चाना चिरनेर परिसरात उधाण आले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कातलपाडा येथे राहत असलेल्या दोन शेतकऱ्यांना तो दिसल्याची चर्चा गावात सुरू आहे.
दरम्यान एका शेतकऱ्याच्या आठ कोंबड्यादेखील अचानक गायब झाल्याने, आणि बिबट्याच्या पायासारखे दिसणारे ठसे या भागात आढळून आल्याने याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क वर्तविण्यात येत आहेत. याबाबत उरण वनविभागाचे अधिकारी कोकरे यांच्याकडे विचारणा केली असता. हे पायाचे ठसे तरस या प्राण्याचे असल्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. उरण तालुक्याचा हा भाग कर्नाळा अभय अरण्याच्या लगत आहे त्यामुळे अभयारण्यातून बिबट्या येथे येण्याची शक्यता नाकारता येत नाही या परिसरात पूर्वी रांनडुकरे, कोल्हे, लांडगे, तरस, ससे, भेकर ,रानमांजर, काळे मांजर, हरीण यासारखे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आढळून यायचे. मात्र गेल्या काही वर्षात येथील डोंगर सपाट करून मोठ्या प्रमाणात कंटेनर यार्ड उभारले आहेत. त्यामुळे येथील वनसंपदा व वन्यं जीव जवळजवळ संपुष्टात आली आहे. कधी कधी भरकटून भेकर, ससा, कोल्हा, हरण यासारखे प्राणी खाद्याच्या शोधात येथे येत असतात वन्यजीव संस्थांच्या सदस्यांनी अनेक वेळा असे प्राणी पकडून सुरक्षित जंगलात सोडले आहेत.
मार्च 2016 मध्ये रानसई परिसरात बिबट्या आला होता. त्याचे चित्रीकरण देखील वनविभागाने केले होते. तर दोन वर्षांपूर्वी चिरनेर, कळंबुसरे, पुनाडे या जंगल भागात देखील बिबट्याला पाहिल्याचे येथील लोक सांगत आहेत त्यामुळे या परिसरात बिबट्या येणे हे नवीन नाही येथील पुरण खोंड्यात मोठ्या प्रमाणावर जंगल आहे येथे बिबट्याला शिकार मिळू शकते त्यामुळे तो कदाचित येऊ सुद्धा शकतो असे येथील जाणकार सांगत आहेत.