पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांचे मार्गदर्शन
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
विधी शाखेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाची कार्यपद्धती, गुन्ह्यांचे स्वरूप आणि कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी याची माहिती मिळावी या उद्देशाने माणगाव येथील नामदेव सुर्वे लॉ कॉलेजच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच माणगाव पोलीस ठाण्याला शैक्षणिक भेट दिली. यावेळी पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या अभ्यास दौऱ्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र राठोड उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक बोराडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामकाज, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया आणि तपासाची पद्धत याबाबत सविस्तर माहिती दिली. गुन्हा घडल्यानंतर प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) कसा नोंदवला जातो, त्याचे कायदेशीर महत्त्व काय आहे तसेच तपासादरम्यान पुरावे गोळा करणे, पंचनामा करणे आणि दोषारोपपत्र (चार्जशीट) न्यायालयात सादर होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे कायदेशीर हक्क, कोठडीतील नियमावली आणि न्यायालयीन प्रक्रियेतील विविध टप्प्यांची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय सध्याच्या काळात वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांपासून कसे सावध राहावे आणि कायद्याने त्याकडे कसे पाहिले जाते, यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. रवींद्र राठोड,
केवळ पुस्तकी ज्ञानापुरते न राहता विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यातील विविध विभाग आणि कार्यप्रणाली प्रत्यक्ष पाहून समजून घेतली. पोलीस आणि वकील हे न्यायव्यवस्थेचे दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत. त्यामुळे या दोन्ही घटकांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून, भविष्यात वकील म्हणून काम करताना त्यांना या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल.
प्राचार्य







