शिक्षण विभागाचा अभिनव उपक्रम
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शाळेतील गुणवत्ता वाढीला चालना मिळावी, जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढावी यासाठी शिक्षण विभागाने एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. गट शिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा यांच्या मार्गदर्शनातून अलिबाग तालुक्यात बीटस्तरावर ही कार्यशाळा सुरु करण्यात आली असून यातून शिक्षकांना धडे देण्याचे काम केले जात आहे.
मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून अनेक पालक त्यांच्या मुलांना अन्य शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवितात. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या कमी होेण्याची भिती कायमच निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद शाळेतील मुलांची पटसंख्या वाढविण्यासाठी कृष्णा पिंगळा यांच्या माध्यमातून एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. शाळेत अध्ययन निष्पत्ती निहाय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांनी कोणते प्रयत्न करावे, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान, शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करणे, अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे नियोजन अशा अनेक विषयांवर सखोल मार्गदर्शन गट शिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा यांच्यासह तज्ञांकडून मार्गदर्शन करून शिक्षकांना घडविण्याचे काम केले जात आहे. तिनविरा येथील टीटीआय स्कूलमध्ये 30 जूलै व बामणगाव येथील हायस्कूलमध्ये 31 जुलैला कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
शाळा सुरु झाल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या अधिक वाढावी, तसेच शालेय कामकाज अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्याचे काम कार्यशाळेतून सुरु केले आहे. या कार्यशाळेत वेगवेगळया तज्ज्ञांकडून संबोधित केले जात आहे. शिक्षक समस्या संवाद, विद्यार्थी विकासाच्या योजना, साधनव्यक्ती अशा अनेक मुद्दयांवर मार्गदर्शन सुरु केले आहे.
कृष्णा पिंगळा
गट शिक्षणाधिकारी, अलिबाग