नवनियुक्त कर्मचार्यांना प्रशिक्षण; शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत जिल्हा परिषदेंतर्गत नवनियुक्त कर्मचारी यांचे सेवांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित प्रशिक्षण शिबीर बुधवारी (दि.26) जिल्हा नियोजन भवन येथे पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून नवनियुक्त कर्मचार्यांना सेवा बजावताना शिस्त, अपिल, वर्तणूक, वित्तीय बाबी, ई-ऑफिस, सेवापुस्तक, रजा नियम, आर्टीफिशिअल इंटेलिजेंस या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी 100 दिवसांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमांतर्गत शंभर दिवसांत नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासनातील सुधारणा या बाबींवर भर दिला जात आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे यांच्या संकल्पनेतून सदर शिबीर आयोजित करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर, शिबिराच्या दुसर्या सत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी शिबिराला भेट दिली. यावेळी सदर शिबिरात नवनियुक्त कर्मचार्यांना मिळणारे प्रशिक्षण त्यांना सेवा बजावताना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कर्मचार्यांनी सर्व शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करावे, असे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले.
या शिबिरात शिस्त अपिल, वर्तणुक या विषयावर माणगाव पंचायत समितीच्या सहाय्यक प्रशासन अधिकारी स्नेहल मोरे यांनी नवनियुक्त कर्मचार्यांना मार्गदर्शन केले. तसेच वित्तीय बाबी या विषयावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, ई-ऑफिस विषयावर माहिती तंत्रज्ञान अधिकारी आय.टी. सेल कृष्णात उथळे, सेवापुस्तक, रजा नियम विषयावर सहायक प्रशासन अधिकारी अंजली वर्तक व कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रसाद पवार, आर्टीफिशिअल इंटेलिजेंस या विषयावर जिल्हा समन्वयक (आपले सरकार), जयेश म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अमरदीप ठोंबरे यांनी केले.