सगुणाबागेत आधुनिक शेतीचे धडे

| नेरळ | वार्ताहर |

शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून शाश्वत शेतीचा पर्याय देणारे कृषिभूषण शेतकरी शेखर भडसावळे यांनी शेतकऱ्यांसाठी एसआरटी पद्धत आणली आहे. त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला असून एसआरटी तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी नेरळ येथील सगुणा बागमध्ये समग्र ग्राम विकासाअंतर्गत युनायटेड वे मुंबई या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक शेतकऱ्यांनी शेतीतील नव्या तंत्रज्ञानाचे धडे गिरवले.

युनायटेड वे मुंबई कार्यान्वित कर्जत येथील जलसंजीवनी प्रकल्पांतर्गत एसआरटी पद्धत परिचय या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरात हवामान बदलामुळे शेतीवर होणाऱ्या दुष्परिणामांना आधुनिक पद्धतींचा उपयोग करून सामोरे जाण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कमीत कमी मशागतीद्वारे किमान खर्चात पिकांची उत्पादकता वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. या वेळी चंद्रशेखर भडसावळे यांनी सगुणा बागेच्या खडतर प्रवासाचा अनुभव सांगितला; तर एक शेतकरी इच्छाशक्ती आणि परिश्रमाच्या जोरावर विपरीत परिस्थितीवर मात करून कशा प्रकारे प्रगती करू शकतो, हे त्यांनी पटवून दिले. जल संजीवनी प्रकल्प कर्जतचे सदस्य मंगेश बोपचे, जोएब दाऊदी, विवेक कोळी, गायत्री ऐनकर, जयश्री ऐनकर, अमर पारधी, जगदीश भला, दीपक कवठे आणि प्रमोद धादवड हे उपस्थित होते; तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात आधुनिक पद्धत आत्मसात करून प्रगती साधावी, असे आवाहन युनायटेड वे मुंबईचे प्रकल्प व्यवस्थापक मुकेश देव यांनी केले आहे.

पॉवर पॉइंटद्वारे मार्गदर्शन
सगुणा रुरल फाउंडेशनचे मार्गदर्शक व संशोधक अनिल निवळकर यांनी पॉवर पॉइंटद्वारे एसआरटी पद्धतीची तांत्रिक माहिती सोप्या भाषेत सांगितली. विषय तज्ज्ञ परशुराम आगिवले यांनी प्रात्यक्षिकासह प्रशिक्षणार्थींचे शंकानिरसन केले. या प्रशिक्षण शिबिराला आदिवासीबहुल भागातील नागेवाडी, मार्गाची वाडी, मोरेवाडी, डोंगरपाडा, वारे, खांडस, इष्टे जांभूळवाडी, बांगरवाडी, पेटारवाडी आणि गावंडवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.
Exit mobile version