छत्रपतींचे विचार काळजात रुजवाः डॉ.अमोल कोल्हे

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अठरा पगड जातीच्या माणसांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या हितासाठी विधायक काम केले आहे. महाराजांचे अनुयायी दाढी, कोरून मिशी वाढवून होता येत नाही. तर, छत्रपतींचे विचार काळजात रुजवावे लागता. परस्त्रीला मातेसमान सन्मान दिला पाहिजे, असा मोलाचा संदेश खासदार तथा सिनेअभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी शनिवारी तरुणांना दिला.


पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या संकुलात प्रभाविष्कार महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी खासदार अमोल कोल्हे त्यांच्या छोटेखानी मुलाखतीत ते बोलत होते. त्यावेळी त्यांच्या पत्नी अश्‍विनी कोल्हे, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, शेकापचे तालुका चिटणीस अनिल पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा शैला पाटील, अलिबाग पंचायत समिती माजी सभापती प्रमोद ठाकूर, नगरसेविका वृषाली ठोसर, संजना कीर, अनिल चोपडा, सुरेश घरत, डॉ.चंद्रकांत वाजे, डॉ.राजेंद्र चांदोरकर, डॉ.अनिल डोंगरे आदी मान्यवरांसह कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, प्राचार्य रविंद्र पाटील आदी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य विद्यार्थी व पालक बहूसंख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्याविष्काराचे सादरीकरण केले.


याप्रसंगी अमोल कोल्हे म्हणाले, आपण शेतकर्‍यांची मुलं आहोत, त्या मातीशी इनामे इतबार कायम राहायचे आहे. त्या भावनेतून छत्रपती शिवाजी महारांजांची भूमिका करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जनमानसात त्यांनी आपली प्रतिमा कर्तृत्वाच्या जोरावर टीकवून ठेवली, अशा महापुरुषांच्या प्रतिमेजवळ जाण्याची संधी मिळत आहे. कुठल्याही क्षेत्रात गेलो तरी शिक्षणाचे महत्व कधीच कमी होत नाही. डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस केली असती तर रोज दोनशे लोकांच्या चेहऱ्यावर आनंद देता आला असता. जेंव्हा कलाकार म्हणून काम करू लागलो तेंव्हा हजार-पाच हजार लोकांच्या चेहऱ्यावर आनंद देता आला. आणि जेव्हा लोकसभेचा सभासद म्हणून काम करू लागलो तेव्हा कोरोना काळात फॅबी फ्लू गोळीची किंमत कमी करून लाखो लोकांच्या चेहऱ्यावर आनंद देवू शकलो. डॉक्टर, अभिनेता, खासदार म्हणून या तीन भूमिकेतून समतोल राखताना आनंदाचा गुणत्तोर महत्वाचा आहे. अंगारा धूपपेक्षा कष्टाने, घामाने, कर्तृत्वाने चांगले काम करा तरच तुम्ही खर्‍या अर्थाने छत्रपतींचे अनुयायी आहात. प्रत्येक जिजाऊला स्वातंत्र्य, विश्‍वास देणे गरजेचे आहे, असे अमोल कोल्हे यंनी सांगितले.

Exit mobile version