हळदी समारंभात रक्तरंजित थरार; निमंत्रण न दिल्याच्या कारणावरून वाद

लोखंडी सळईने जीवघेणा हल्ला, एकजण गंभीर जखमी

। महाड । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील कुंभेशिवथर गावात हळदी समारंभादरम्यान झालेल्या वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित हल्ल्यात झाले. दारूच्या नशेत झालेल्या वादातून दोन जणांनी नातेवाईकावर लोखंडी सळईने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात विनोद पांडुरंग साळुंखे (40) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू आहेत.

ही घटना 13 मे रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कुंभेशिवथर बसस्टॉप परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी विनोद साळुंखे तसेच आरोपी दिलीप साळुंखे आणि अल्पेश जाधव हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. गावात सुरू असलेल्या हळदी कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र आले होते.
कार्यक्रमाला निमंत्रण न दिल्याच्या कारणावरून आरोपींनी मनात राग धरल्याचे समोर आले आहे. दारूच्या नशेत झालेल्या शाब्दिक वादानंतर आरोपींनी शिवीगाळ करत विनोद साळुंखे यांच्यावर कमरेला अडकवून ठेवलेल्या टोकदार लोखंडी सळईने हल्ला केला. त्यांच्या डाव्या कुशीवर आणि डाव्या हातावर वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमींना प्रथम महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

याप्रकरणी दत्ता विलास मोरे यांच्या फिर्यादीवरून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात कारवाई सुरू केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फडतरे करत आहेत.

दरम्यान, मुख्य आरोपी दिलीप साळुंखे याच्याविरोधात यापूर्वीही मारहाण आणि गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे कुंभेशिवथर परिसरात खळबळ उडाली आहे.

Exit mobile version