पोटनिवडणुका एकत्रच लढू; मविआचा निर्धार

| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एकत्र लढून यश मिळाल्याने आता विधानसभेच्या पोटनिवडणुकाही एकत्रपणे लढविण्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे. तशी घोषणाही शुक्रवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आली. गुरुवारी विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागला.यामध्ये सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का देत महाविकास आघाडीने औरंगाबाद,अमरावती,नागपूरमध्ये विजय संपादित केला तर नाशिकमध्ये अपक्ष सत्यजित तांबे हे निवडून आलेले आहेत.या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद शुक्रवारी मुंबईत घेण्यात आली.यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,शिवसेना नेते सुभाष देसाई आदी उपस्थित होते.यावेळी होणार्‍या कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघांच्या पोटनिवडणुका आघाडीच्या माध्यमातूनच लढविण्याचा निर्धार मविआच्या नेत्यांनी केला आहे.या दोन्ही मतदार संघांमध्ये 27 फेब्रुवारीला पोटनिवडणुका होत आहेत.या दोन्ही मतदार संघातील उमेदवारांची घोषणा दोन दिवसात पुण्यात केली जाईल,असे या नेत्यांनी जाहीर केले.

तांबेना स्वगृही घ्या -पवार
नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले सत्यजीत तांबे यांनी फार ताणू नये व काँग्रेस पक्षानेही मनाचा मोठेपणा दाखवावा. सत्यजीत तांबे यांनी मधील एक महिन्याचा काळ विसरुन जावा आणि काँग्रेसचे सहयोगी म्हणून काम करावे, असा सल्ला अजित पवार यांनी दिला. ते मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

नाना पटोलेंचा सवाल
अजित पवार यांनी सत्यजीत तांबे यांच्या राष्ट्रवादीच्या गोटातून प्रयत्न झाल्याचे वक्तव्य केले. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसनेही तांबेंना निवडून देण्यासाठी मदत केली, असा अर्थ निघतो. अजित पवार स्वत: तशी कबुली देत आहेत. नाशिकमध्ये शुभांगी पाटील या मविआच्या अधिकृत उमेदवार होत्या. त्यामुळे अजित पवार यांच्याकडून सत्यजीत तांबेंच्या समर्थनाची भाषा चिंता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण ताकद लावली असती तर शुभांगी पाटील निवडून आल्या असत्या. आम्ही महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत अजित पवार यांना विचारू, असे नाना पटोले यांनी म्हटले.

अमरावतीचा निकाल
30 तासांनी जाहीर

अमरावती,अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील यांचा विजय झाला आहे.तब्बल 30 तास ही मतमोजणी होती. दुसर्‍या पसंतीच्या मतमोजणीत धीरज लिंगाडे पाटील यांना 46 हजार 344 मते मिळाली. तर रणजित पाटील यांना 42 हजार 962 मते मिळाली आहेत. अत्यंत चुरशीच्या या लढतीत लिंगाडे पाटील यांनी अखेर बाजी मारली आहे. अकोल्यात डॉ. रणजीत पाटलांच्या अनपेक्षीत पराभवाचा भाजपला धक्का बसला आहे.

Exit mobile version