| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. 198 घरांसह 8 पोल्ट्रीची पडझड झाली असून 766 जणांना पुरासह दरडीच्या भितीने सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामध्ये रोहामधील कुंडलिका, अंबा, महाडमधील सावित्री, पनवेलमधील पाताळगंगा, कर्जतमधील उल्हास व पनवेलमधील गाढी या नद्या पाण्याने भरल्या असून जिल्ह्यातील 28 धरणांपैकी 18 धरणे पूर्णपणे भरली आहेत . नदी, धरणाजवळील दरडग्रस्त गावांमधील 766 नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यात मुुरुडमधील राजपुरी येथील दरडग्रस्त गावांतील 40, महाडमधील पुरग्रस्त व दरडग्रस्त गावांमधील 255, पोलादपूरमधील 72, पेणमधील 20, माणगावधील 83, पनवेल मधील 24, खालापूर मधील 104, अलिबाग मधील 128 जणांना स्थलांतरित केले आहे. काहींना त्यांच्या नातेवाईकांकडे तर काहींना समाजमंदिर, जिल्हा परिषद शाळा व प्रशासनाने तयार केलेल्या कॅम्पमध्ये स्थलांतरित केले आहे. या पावसामध्ये 198 घरांसह 6 पोल्ट्रीची पडझड झाल्याने नुकसान झाले आहे. तसेच म्हसळा, तळा, महाड व पेणमधील समाज मंदिरसह अंगणवाडीदेखील पडझड झाली आहे.
या पावसात इर्शाळवाडीमध्ये कोसळलेल्या दरडीत सापडलेल्या 228 लोकांपैकी 16 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 109 जणांचा एनडीआरएफ दलामार्फत शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजल्यापासून शोध सुरु करण्यात आला. पाऊस असल्याने दरडीत सापडलेल्यांना शोधताना यंत्रणेची तारांबळ उडालेली. तरीदेखील भर पावसात जीवाची बाजी लावत ही यंत्रणा काम करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.