। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दितील मोहोदर गावात जागेच्या वादातून 58 वर्षीय महिला व तिची मुलगी यांचा निर्घृण खून करण्याचा प्रकार घडला होता. प्रत्यक्षदर्शी कोणताही साक्षी पुरावा नसताना पोलिसांच्या योग्यरित्या तपासाने दोघाजणांना खुन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी दोघे दोषी आढळून आल्याने न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची तसेच तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहोदर गावात एका झोपडीत निराबाई (58) व तिची मुलगी (30) अशा दोघी राहात होत्या. त्यांचे किराणा मालाचे दुकान होते. तसेच त्या झोपडीत दारुची विक्रीसुद्धा करीत होत्या. त्या झोपड्या आमच्या मालकीच्या आहेत, असे सांगून कैलास पांडुरंग पवार, पंढरीनाथ पांडुरंग पवार हे दोघे भाऊ नेहमी त्यांच्याशी वाद घालत होते. कैलास पवार व पंढरीनाथ पवार हे दोघे निराबाईच्या झोपडीत आले आणि त्यांनी दारु पाहिजे, असे सांगून निराबाईला दार उघडायला लावले.
निराबाई दार उघडून बाहेर आल्यावर दोघांनी तिच्या डोक्यात दांडुका घालून तिला गंभीर जखमी केले तर हा आरडाओरडा ऐकून तिची मुलगी सुरेखा ही झोपडी बाहेर आल्यावर या दोघांनी तिच्या डोक्यात दांडका मारल्याने ती जागीच ठार झाली. न्यायालयाने सरकारी पक्षातर्फे 17 साक्षीदार तपासले आणि त्यातून दोघेही दोषी आढळले. कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना पोलिसांनी योग्यरित्या तपास करुन दोघांना अटक करुन साक्षीदार तसेच पंच गोळा केल्याने केस भक्कम झाली. या गुन्ह्याचा पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील कार्यरत सहा. पोलीस निरीक्षक आनंदा सावंत यांनी यशस्वीरित्या तपास केला. पोलीस हवालदार सुनील केदार, पोलीस नाईक विवेक म्हात्रे यांचे सहकार्य लाभले.