| श्रीवर्धन | वार्ताहर |
दिवेआगर येथील श्री सुवर्ण गणेश प्रकटस्थान व समुद्रकिनारी जाणार्या सुवर्ण गणेश पाखाडी येथील मुख्य रस्ता खचला असून, रस्त्याच्या दुतर्फा जीवघेणे भलेमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना खचलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनांचे सर्रास अपघात घडत आहेत. येथील रस्त्याचे काम मागील काही दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत रखडले असून, वाहनचालक व स्थानिक व पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याबाबत दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करावी, अशी संतापजनक मागणी स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांकडून केली जात आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील अमर्याद विस्ताराचा समुद्रकिनारा लाभलेले दिवेआगर हे अस्सल कोकणी टुमदार गाव आहे. दिवेआगरमध्ये श्री सुवर्ण गणेश प्रकट झाल्यानंतर पर्यटकांचा ओढा दिवेआगरकडे अधिक वाढला आहे. त्यामुळे पर्यटन स्थळाबरोबरच तीर्थक्षेत्र म्हणूनही दिवेआगरचा संपूर्ण देशभरात लौकिक आहे. याठिकाणी परदेशी पाहुणेही मोठ्या संख्येने येत असतात. विकेंडला, सुट्टीच्या दिवशी दिवेआगरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र अशातच गावांमधील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्याही जटिल होत चालली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे गावातील डागडुजीविना रखडलेले अपूर्ण अवस्थेतील रस्ते व रस्त्यांवरील भलेमोठे खड्डे हे आहे. रस्त्यांमुळे निर्माण होणार्या वाहतूक वाहतूक कोंडीचा स्थानिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो.
मागील काही दिवसांपासून सुवर्ण गणेश पाखाडी येथील येथील रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. परिणामी, याठिकाणी वाहतुकीला अडथळा होण्यासोबतच वळणावर रस्त्याच्या दुतर्फा पडलेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे अपघातांचे सर्रास प्रसंग घडत आहेत. रात्रीच्यावेळी हे खड्डे दृष्टीस येत नसल्याने काही पादचारी येथील खड्ड्यात पडून किरकोळ दुखापत झाल्याच्याही तक्रारी आहेत. तरी स्थानिक प्रशासनाने याबाबत दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करावी.
मकरंद जोशी,
स्थानिक- दिवेआगर
आम्ही पुणे येथून दिवेआगरमध्ये पर्यटनासाठी आलो आहोत. दिवेआगरमध्ये प्रवेश करताच ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आमच्याकडून कर आकारला गेला. मात्र गावात येताच भल्यामोठ्या खड्ड्यात आमची गाडी आदळून गाडीचे नुकसान झाले. यासाठीच प्रशासनाने आमच्याकडून कर आकारला का? दिवेआगरमध्ये येताच भल्यामोठ्या खड्ड्यांनी आमचे स्वागत केले. एखाद्यावर जीवघेण्या अपघाताचा प्रसंग ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादी मोठी दुर्घटना घडण्याची प्रशासन व कंत्राटदार वाट पाहत आहे का?
संदीप चिपळूणकर,
प्रवासी-पुणे