स्थानिकांच्या मदतीने पोलिसांकडून अटकेची कारवाई
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ पोलीस ठाणे हद्दीत एकाच रात्रीत चार दुकाने फोडणार्या चोरट्याने निर्माण नगरी भागात घरफोडी केली होती. मात्र, स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आणि नेरळ पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून नाकाबंदी केल्याने घरफोडी तसेच चोरी प्रकरणात पोलिसांच्या रेकॉर्ड लिस्टमध्ये असलेल्या गुन्हेगाराला अटक करण्यात आली.
नेरळ गावातील निर्माणनगरी येथील डिझाईन पार्थ बिल्डींगमध्ये सात फेब्रुवारी रोजी पहाटे सव्वा तीन वाजता घरफोडी झाली होती. बंद फ्लॅटचा मुख्य दरवाजाचे लॉक कटावनी व स्क्रू ड्रायव्हरने तोडून घरफोडी चोरी करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी आजूबाजूला राहणारे रहिवाशांना त्याबाबत कानकुन लागली आणि त्यांनी पोलिसांना संपर्क केला. त्याआधी त्या चोरट्याने नेरळ गावातील चार दुकाने फोडून चोरी केली होती. स्थानिकांच्या हालचालीमुळे चोरट्याला संशय आला आणि त्याने पळ काढण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी नेरळ पोलिसांनी आधीच नाकाबंदी लावली होती आणि शेवटी हा चोरटा पोलिसांच्या हाती लागला.कल्याण येथे राहणारा मोहम्मद फिरोज नईम अहमद खान यास ताब्यात घेण्यात आले.त्यावेळी त्याच्याकडे घरफोडी, चोरी करण्याकरिता लागणारे लोखंडी कटावनी, स्क्रू ड्रायव्हर आणि रोख रक्कम आढळून आले. नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
गुन्ह्यामध्ये आरोपीने चोरलेली 17,700/- रूपये किमतीची रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे. सदरची उत्कृष्ट कामगिरी निर्माण नगरी परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे तसेच नेरळ परिसरात रात्रौ गस्त घालणारे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भिंगारे, पोलीस अंमलदार सहा. फौजदार साळुंखे, पोलीस हवालदार सुरेश मोरे, देवेंद्र शिनगारे, राजाराम पिंगळे, पोलीस शिपाई मनोहर दुम्हारे, प्रसाद पिसाट यांच्याकडून दाखवण्यात आलेल्या समयसूचकता याबद्दल कौतुक होत आहे.