। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यातील चिखली, कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामे, पत्राशेड काढून घेण्यासाठी व्यावसायिकांना दिलेली सहा दिवसांची मुदत संपल्यानंतर महापालिका प्रशासनाने शनिवारी (दि.8) अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली. शनिवारी दिवसभरात महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तब्बल 42 एकरमधील 18 लाख 36 हजार 532 चौरस फुटांवरील 222 बांधकामांवर कारवाई केली आहे. कारवाईविरोधी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. तसेच, या भागातील इंटरनेट सेवा बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी, पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी प्रत्यक्ष कारवाईस्थळास भेट देऊन पाहणी केली. तसेच, प्रशासनाला सूचनादेखील केल्या.
या कारवाईदरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, उपआयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, अजिंक्य येळे, किशोर ननवरे आदी अधिकारी सहभागी झाले होते. या कारवाईमध्ये महापालिका अतिक्रमण धडक कारवाई पथकामधील 4 कार्यकारी अभियंते, 16 उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे 180 जवान, 600 पोलीस आणि मजूर कर्मचारी सहभागी झाले होते. 16 पोकलेन, 8 जेसीबी, 1 क्रेन आणि 4 कटर यांचा वापर निष्कासन कारवाईमध्ये करण्यात आला. शिवाय 3 अग्निशमन वाहने आणि 2 रुग्णवाहिकादेखील येथे तैनात करण्यात आल्या होत्या.