22 टक्के मोबदला स्वीकारण्यास नकार
। ठाणे । प्रतिनिधी ।
मेट्रोच्या कारशेडसाठी सात बारा नावावर असलेल्या शेतकर्यांना 22.5 टक्के तर अतिक्रमित शेतकर्यांना 12.5 टक्के मोबदला देण्याच्या शासनाच्या निर्णयाला मोघरपाडा येथील शेतकर्यांनी विरोध दर्शवला आहे. 100 टक्के जमिनीच्या बदल्यात 100 टक्के मोबदला पाहिजे, अशी भूमिका घेतल्याने मेट्रो कारशेडचा प्रश्न पुन्हा एकदा चिघळला आहे.
वडाळा-घाटकोपर ते कासारवडवली आणि पुढे गायमुख अशा मेट्रो मार्गाचे काम सुरु असून मेट्रोच्या कारशेडसाठी घोडबंदर पट्ट्यातील मोघरपाडा येथील जागेवर मेट्रो कारशेडचे आरक्षण टाकण्यात आले आहे. उदरनिर्वाहासाठी शासनाने ही जमीन शेतकर्यांना शेतीसाठी दिली असून 1973 पासून शेतकरी या ठिकाणी शेती करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. आता वडाळा-घाटकोपर ते कासारवडवली या मेट्रो मार्गाच्या कारशेडचे आरक्षण या जागेवर टाकण्यात आल्याने 250 पेक्षा अधिक शेतकरी बाधित होणार असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन जाणार आहे.
यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या उपस्थितीत एका महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ज्या शेतकर्यांच्या नावावर सात बारा आहे, त्यांना 22.5 टक्के मोबदला शासनाच्या नियमानुसार देण्यात येईल. ज्या शेतकर्यांचे नाव नाही; परंतु अतिक्रमण कब्जा आहे तसेच ती जमीन शासनाची असल्यास अशा शेतकर्यांना 12.5 टक्के शासनाच्या नियमानुसार मोबदला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून शेतकर्यांसमोर ठेवण्यात आला. मात्र, शुक्रवारी झालेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या 287 शेतकर्यांनी 22.5 आणि 12.5 मोबदल्याचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.