| मुंबई | प्रतिनिधी |
मुलुंड (आय.टी.आय.) येथे सुरू झालेला लाइटहाऊस प्रकल्प दीपस्तंभाप्रमाणे काम करेल. कोणत्याही पदवीबरोबरच जागतिक बाजारपेठेत आवश्यक कौशल्य विकसित होणे अत्यंत गरजेचे आहे. हा फाऊंडेशन कोर्स आधुनिक काळातील कौशल्य विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी यांनी सांगितले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय आणि लाइटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्यामार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड येथे मुंबईतील पहिल्या लाइटहाऊसचे उद्घाटन श्रीमती चौधरी यांच्या हस्ते झाले.
यावेळी व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, महाराष्ट्र कौशल्य विकास मंडळाचे संचालक योगेश पाटील, लाइटहाऊस कम्युनिटीजचे चेअरमन डॉ. गणेश नटराजन, इक्लर्क्सला सर्व्हिसेस लिमिटेडचे सह-संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी पी. डी. मुंद्रा, लाइटहाऊस कम्युनिटीजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुची माथूर उपस्थित होते.
श्रीमती चौधरी म्हणाल्या, युवक आणि युवतीना स्पोकन इंग्लिश आणि डिजिटल साक्षरता अशा प्रकारचे प्रशिक्षण लाइटहाऊस प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ही 21 व्या शतकातील आवश्यक आणि गरजेची कौशल्ये आहेत. केवळ रोजगार देण्याऐवजी हा कार्यक्रम तरुणांना नोकरीत राहण्यास आणि करिअर घडविण्यास सक्षम करतो.
शेफाली शिरसेकर आणि वैभव कोल्हे यांनी प्रास्ताविक केले. लाइटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशनच्या मुख्य कार्यक्रम अधिकारी अमृता बहुलेकर यांनी आभार मानले.