महाराष्ट्र बारव मोहिमेचा अभिनव उपक्रम
अनेक सदस्यांचा सहभाग
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात महाराष्ट्र बारव मोहिमेने कर्जत-खालापूर तालुक्यात 15 पाय विहिरीवर दिव्यांची रोषणाई करत महाशिवरात्रीला साजरी केली. राजे प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन विभाग कर्जत व ग्रामस्थ यांच्या वतीने कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथील अष्टकोनी तलाव, वैजनाथ, कोठीम्बे, टाकवे, मानिवली, दहिवली(नेरळ), डिकसळ, हालीवली, तळवली येथील पायविहिरीवर हा दिपोत्सव साजरा झाला. तसेच खालापूर तालुक्यातील तुपगाव, कराडे व ताकई गावातील पायविहिरीवर वेध सह्याद्री रायगड व पराडे गावात आशिष जाधव व सहकारी व कर्जत-चौक हायवेवरील पायविहिर पालघर येथील दुर्गरक्षक फोर्स एमएच यांच्यावतीने सजविण्यात आल्या.
महाराष्ट्र बारव मोहीम अंतर्गत ऐतिहासिक पायविहिरी, बारव यांचे जतन व संवर्धन व्हावे या हेतूने लोकसहभागातून रोहन काळे या मुंबईत राहणार्या तरुणाने सुरू केलेल्या मोहीमेतून आज महाराष्ट्रभर तब्बल 1600 च्या वर पायविहिरीचें, बारव पुष्कर्णी, बाव ,पोखरण यांचे गुगल मॅपिंग झालेले आहे. ह्या बारावांचे जतन व संवर्धन तसेच ऐतिहासिक पायविहिरीचें दस्तऐवजीकरण करणे पाणीटंचाईवर मात करणे, पर्यटन वाढवणे असे बहूउद्देशीय हेतू या मोहिमेद्वारे साध्य केले जाणार आहेत.
बारव दिपोत्सव
महाराष्ट्र बारव मोहीम अजून मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहचवावी म्हणून जनजागृती करण्यासाठी महाशिवरात्रीचे निम्मित साधत महाराष्ट्रभर 160 पायविहिरीवर दिपोत्सव साजरा झाला. महाराष्ट्र मधील पडीक पायविहिरीचे जतन व संवर्धन व्हावे व त्यांचे पुनरुज्जीवन व्हावे ह्या हेतूने बारव दिपोत्सव हा अभिनव उपक्रम राबवला गेला.
या पायविहिरीचे जतन व संवर्धन व्हावे या करता राजे प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन विभाग कर्जत व दुर्गजागर व वेध सह्याद्री यांच्या संयुक्त मोहीमा या पायविहिरीवर घेणार येत आहेत. त्यात पडीक पायविहिरिंचे जतन व संवर्धन करण्याची मोहीम राजे प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन विभाग करत आहे. – समाधान पाटील, अध्यक्ष, राजे प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन विभाग, कर्जत.
