मोहोपाड्यात वीज कोसळून विद्युत उपकरणांचे नुकसान

12 ते 12 घरांतील उपकरणे जळाली; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

। रसायनी । प्रतिनिधी ।

मोहोपाडा येथे सायंकाळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज कोसळल्याने ग्रामस्थांच्या घरातील विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ग्रामपंचायत सदस्या रसिका राकेश खराडे यांच्या घराजवळ वीज पडल्याने परिसरातील सुमारे 12 ते 13 घरांतील टीव्ही, फ्रीज, पंखे, वायफाय राऊटर, सीसीटीव्ही यंत्रणा यांसह विविध विद्युत उपकरणांचे नुकसान झाले.

सायंकाळच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट वाढला आणि मोठ्या आवाजासह वीज कोसळली. त्यानंतर रसिका खराडे यांच्या घरातील वायफाय राऊटरने पेट घेतला, तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या डिव्हाईस वायर जळाल्या. प्रसंगावधान राखत घरातील सदस्यांनी तात्काळ आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. त्यांच्या घरातील फ्रीज जळाला असून काही पंखेही बंद पडले.

याच घटनेत वैभव खराडे यांचा एलईडी टीव्ही संच जळाला, तर अनिल खराडे यांच्या घरातील दोन सीलिंग फॅनचे नुकसान झाले. शोभा अनिल रेपाले दोन फॅंन, मनोहर तांडेल यांचा व्हायफाय राऊटर तसेच आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांच्या विद्युत उपकरणांचे नुकसान झाले. याशिवाय परिसरातील अन्य 11 ते 12 घरांमधील विविध विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. वीज कोसळण्याच्या घटनेनंतर काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

वीज वितरणाच्या कारभाराबाबत ग्रामस्थांचा सवाल
परिसरात विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस सुरू असतानाही वीजपुरवठा खंडित करण्यात आला नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे अचानक झालेल्या वीजप्रवाहातील बिघाडामुळे विद्युत उपकरणांचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करून संबंधित विभागाने पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्तांना योग्य ती मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
Exit mobile version