लायन्स हेल्थ फाऊंडेशनचा नेत्ररोगांविरुद्ध अभूतपूर्व लढा

सुपर स्पेशालिटी नेत्ररुग्णालयाचे झाले भूमीपूजन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
लायन्स हेल्थ फाऊंडेशन, अलिबागने मोतीबिंदू आणि नेत्ररोगांविरुद्ध जो लढा उभारला आहे, तो अभूतपर्व आहे. रायगड जिल्ह्यातील कानाकोपर्‍यातील 65 हजार लोकांची तपासणी, 6 हजार नेत्रशस्त्रक्रिया, त्यातील 4500 मोफत नेत्रशस्त्रक्रिया, महात्मा फुले जन आरोग्य योजना, पंतप्रधान जन आरोग्य योजना हा लायन्स हेल्थ फाऊंडेशनचा चार वर्षांतील आलेख कौतुकास्पद आणि अभिमानास्पद असल्याचे प्रशंसोद्गार लायन्स इंटरनॅशनल डायरेक्टर व्ही.पी. नंदकुमार यांनी काढले.
लायन्स हेल्थ फाऊंडेशन, अलिबाग अद्ययावत नेत्रचिकित्सा, शस्त्रक्रिया व नेत्रचिकित्सक प्रशिक्षण केंद्र सोगाव येथे उभारत आहे. या सुपर स्पेशालिटी नेत्ररुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठीचे भूमीपूजन रविवारी (दि.14) सकाळी 10-30 वाजता करण्यात लायन्स इंटरनॅशनल डायरेक्टर व मणीप्पुरम गोल्ड कंपनीचे मालक व्ही.पी. नंदकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर एलसीआयएफ कॅम्पेन 100 एरिया लीडर हनुमान अगरवाल, मल्टिपल कौन्सिल चेअरमन राकेश चौमल, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लुनकरन तावरी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर-1 मुकेश तनेजा, डिस्ट्रिक गव्हर्नर-2 अमरचंद शर्मा यांच्यासह लायन्स हेल्थ फाऊंडेशन, अलिबागचे अध्यक्ष अनिल जाधव, उपाध्यक्ष नितीन अधिकारी, सचिव प्रवीण सरनाईक, रिजन चेअरमन अरविंद घरत आदी मान्यवर उपस्थित होते.
या समारंभासाठी माजी प्रांतपाल बाबुराव पिसाळ, अशोक जोशी, राजेश प्रजापती, ओमप्रकाश अरोरा, के.जे. पॉल, डॉ. जयंत पारेख, संतोष चौहान, आरडीसीसी बँकेचे सीईओ प्रदीप नाईक, नयन कवळे, प्रदीप सिनकर, प्रवीण घरत, आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Exit mobile version