खारघर हद्दीत 76 लाखांची दारु जप्त

| पनवेल । वार्ताहर ।

खारघरमध्ये नव्याने बार सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे नागरिकांची ‘नो लिकर झोन’ची मागणी धुडकावली गेली. खारघरच्या हद्दीत दारू विक्री होऊ नये, अशी नागरिकांची मागणी असतानाच, खारघर शहराच्या हद्दीतच तब्बल 76 लाख 77 हजार रुपयांची बेकायदा दारू पनवेलच्या उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली. दारूने भरलेला ट्रक गुजरातकडे जात असल्याचा उत्पादन शुल्क विभागाचा अंदाज आहे. गुजरातमध्ये दारूबंदी असताना, तिथे दारूचा ट्रक कसा निघाला, याबाबत शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.

गोवा येथे निर्मिती केलेल्या दारूचा ट्रक गुजरातकडे जाणार असल्याची माहिती पनवेलच्या उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार 17 डिसेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संजय परूळकर यांच्या सहकार्‍यांनी सापळा रचून खारघर येथील कोपरा गावाच्या हद्दीत ट्रक ताब्यात घेतला. ट्रकचालक संदीप पंडीत (38), वाहक समाधान धर्माधिकारी (30) या दोघांना ट्रक आणि मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. गोवा राज्यात बनवण्यात आलेल्या दारूचे 898 खोके जप्त करण्यात आले. एका खोक्यांमध्ये 48 बाटल्या याप्रमाणे 650 खोक्यांमधील एकूण 31 हजार 200 सीलबंद बाटल्या तसेच 750 मिली क्षमतेच्या एका खोक्यामध्ये 12 बाटल्या प्रमाणे 248 खोक्यांमधील व्हिस्कीच्या दोन हजार 976 बाटल्या जप्त करण्यात आल्या.

Exit mobile version