| रोहा | प्रतिनिधी |
तालुक्यातील मांदाड येथे पंचविसव्या श्री काडसिद्धेश्वर महाराज सांप्रदायिक सत्संग सोहळा दि.22 नोव्हेंबर रोजी श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या सभागृहात दर्शन व अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न झाला. त्याप्रसंगी रायगड जिल्ह्यातील असंख्य भक्तगण परमपूज्य कणेरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींच्या मुखातून अमृतमय वाणीतून येणारे विचार ऐकण्यासाठी उपस्थित होते. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींचे आगमन होताच टाळ मृदुंगांच्या तालावर भजनाचे सूर लावून रायगड समितीने जोरदार स्वागत केले. तो सोहळा पाहण्यासारखा होता.
यंदाचा सत्संग सोहळा रौप्य महोत्सवी असल्यामुळे एक वेगळा आनंद या सोहळ्यास प्राप्त झाले होते. जेमतेम दहा ते बारा गुरुबंधू असलेल्या या गावात गेली पंचवीस वर्षे निरंतर परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज कोल्हापूर येथून प्रवचनातून प्रबोधन करण्यासाठी येत असतात. अविरत चालू असलेल्या या सत्संग सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या अनमोल वाणीच्या प्रवचनातून आशीर्वाद देत श्रवण केल्याने कोणते फायदे होऊ शकतात हे पटवून दिले.
मांदाड येथील काडसिद्धेश्वर महाराज सांप्रदायिक मंडळाने उत्तम कार्यक्रमाचे आयोजन करुन पंचविसव्या अध्यात्मिक सत्संग सोहळ्यात जराही कमतरता न दाखवता सांप्रदायातील आलेल्या भक्तगणांची सेवा मांदाड सांप्रदायिक मंडळाने आरती भजन करुन व त्यानंतर शेजारती करण्यात आली. शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.







