कोमसाप अलिबाग शाखेची साहित्यिक वर्षा सहल

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोकण मराठी साहित्य परिषद , अलिबाग शाखेच्या सदस्यांची रविवार दि. 17 जुलै रोजी पुण्याजवळील खडकवासला परिसरातील कुडजे गावातील म झपूर्झा म कलादालन पाहण्यासाठी साहित्यिक वर्षा सहल गेली होती. यात पंचवीस पासून पंचाहत्तर वयाच्या सद्स्यांचा समावेश होता.

साहित्य , कला आणि पुरातन वस्तूंचा तो संग्रह पाहून डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे काय याचा प्रत्यय आला. पु. ना. गाडगीळ न्ड सन्सचे अजित गाडगीळ यांच्या संग्रह नि कल्पनेतून हे कलादालन उभं राहिलंय. दहा दालनातून केलेली सुबक मांडणी,स्वच्छता सोयी आणि व्यवस्था अतिशय सुंदर आहे. प्रत्येक ठिकाणी त्या त्या वस्तूची किंवा फोटो , चित्रांची माहिती नुसती लिहिलेली नसून ती देण्यासाठी मार्गदर्शक आहेत. व्यवस्थापकही स्वत: जातीने फिरुन लक्ष ठेवत होते. शाखेतर्फे व्यवस्थापकांना म झपूर्झा म या कवी केशवसुतांच्या कवितेतील दोन कडवी सुलेखन करुन दिली. त्यांना ते खूप भावलं. सदर कलादालन हे शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी खूप छान ठिकाण आहे.

चार दिवसांपूर्वी तुफान पडत असलेल्या पावसात भिजणं हा वर्षा सहलीचा मुख्य उद्देश असूनही सहलीच्या दिवशी पावसाने दडी मारल्याने थोडा विरस झाला मात्र कविता , गाणी , साहित्यिक गप्पांच्या पावसात सारे चिंब भिजले. संधी मिळाली तर किंवा मुद्दाम वेळ काढून आवर्जून हे कलादालन प्रत्येकाने पहायला हवंच.

Exit mobile version