| अलिबाग | प्रतिनिधी |
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अलिबाग शाखेचा वर्धापनदिन उत्साहाने साजरा करण्यात आला. डॉ. चंद्रकांत वाजे यांच्या ढोलपाडा-खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये निसर्गरम्य वातावरणात हा सोहळा साजरा करण्यात आला.
कोमसाप अलिबाग शाखेचा विसावा वर्धापनदिन दिनांक 25 नोव्हेंबर रोजी होता , ते औचित्य साधून 4 डिसेंबर रोजी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोमसाप शाखेतील सर्व ज्येष्ठ व सन्माननीय सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ सदस्य अनंत देवघरकर यांनी लिहिलेले ध्वनीमुद्रित ईशस्तवन व मेघना केळकर- म्हात्रे यांनी गायिलेल्या सुरेल स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाखेच्या अध्यक्ष सुजाता पाटील यांनी सर्वांचे स्वागत करीत मनोगत व्यक्त केले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, जिल्हा अध्यक्ष सुधीर शेठ यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेने आकारास येत असलेल्या साहित्यिक उपक्रमांबद्दल त्यांनी माहिती दिली. मराठी भाषेच्या समृद्ध साहित्याचा वारसा पुढे न्यायचा असेल तर तरुण पिढीला सोबत घेऊन ही साहित्यिक चळवळ चालू ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ सदस्य वैशाली भिडे यांनी केले.
त्यानंतर अडीच तास कोमसाप अलिबाग शाखेतील सर्व सदस्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. कविता, गझल, फटका, नाट्यछटा, अभिनय, सुलेखन, स्वलिखित कथावाचन, भावपूर्ण अभिवाचन, पत्रवचन, अशा वैविध्यपूर्ण, बहुरंगी साहित्यिक कार्यक्रमात सर्वजण रंगून गेले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमसाप अलिबाग शाखेच्या कार्यकारिणी सदस्य व सल्लागार वर्षा दिवेकर यांनी केले.
कोमसाप अलिबाग शाखा उपाध्यक्ष निर्मला फुलगावकर यांनी सर्वांचे आभार मानले. सलग दोन वर्षे डॉ. वाजे व रसिका वाजे व त्यांचे कुटुंबीय यांनी अतिशय अगत्याने व नियोजनपूर्वक वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन त्यांच्या फार्महाऊसवर केले, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.