। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत हे पर्यटन केंद्र बनले असून सुट्टीच्या दिवशी आपल्या फार्म हाऊस तसेच रिसॉर्टवर पर्यटकांची मांदियाळी असते. मात्र, तेच पर्यटक आपल्या घरी परतत असताना कचरा भरून आणलेल्या पिशव्या तालुक्यातील रस्त्याच्या कडेला टाकून देत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. दरम्यान, फार्म हाऊसवर मौजमजा करण्यासाठी आलेल्या या पर्यटकांच्या चुकीच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कर्जत तालुक्यातील दहिवली येथील पेट्रोल पंपानजीक एक व्यक्ती आपल्या (एमएच-01_-डीके-1760) गाडीच्या डिकीतून मोठमोठ्या पिशव्या बाहेर काढताना आढळली. त्याने पिशव्यांमध्ये भरुन आणलेला कचरा रस्त्याच्या बाजूलाच टाकला. यावेळी, गितेश दिघे, हर्षद मोरे आणि गोपाल शेलार यांनी कचरा टाकणार्या त्या व्यक्तीला रस्त्याच्या बाजूला कचरा टाकण्याचा मज्जाव केला. त्यावेळी त्या व्यक्तीने त्यांच्यावर अरेरावी करायला सुरूवात केली. त्यानंतर त्या तरुणांनी त्या व्यक्तीचा कचरा टाकत असतानाचा फोटो, व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि रस्त्याच्या बाजुला फेकलेल्या कचर्याच्या मोठमोठ्या पिशव्या पुन्हा गाडीत ठेवायला सांगितल्या. अशा प्रकारे जागृत तरुणांनी शहराबाहेर राहणार्या आपल्या शहरात टाकला जाणारा कचरा तेथे टाकू दिला नाही.
कर्जत शहरात कचरा आणून फेकणार्या परप्रांतीय व्यक्तीला रोखले असले तरी अशा प्रकारे कर्जत शहरात दररोज बाहेरून कचरा आणून टाकला जात आहे. कचरा टाकणार्यांवर कर्जत नगरपरिषदेने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागेश दिघे यांनी केली आहे.