| म्हसळा | प्रतिनिधी |
लहान मुलांचा आवडता पदार्थ असलेल्या मॅगीमध्ये चक्क जिवंत किडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार म्हसळा शहरातून समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हसळा शहरातील एका घरात गृहिणीने नेहमीप्रमाणे मुलांसाठी मॅगी उकडायला टाकली. पाणी उकळल्यानंतर वर दोन किडे तरंगताना दिसले. सुरुवातीला भांड्यात आधीपासून किडे असतील असे वाटले. मात्र, संशय आल्याने जेव्हा पॅकेट तपासले, तेव्हा सीलबंद पॅकेटच्या आतही एक किडा रेंगताना दिसून आला. हा प्रकार पाहताच कुटुंबाची झोपच उडाली. सध्या लहान मुलांमध्ये मॅगीचा क्रेझ प्रचंड वाढला आहे. जेवणातही मुले मॅगीची मागणी करतात. अशा वेळी ब्रँडेड कंपनीच्या सीलबंद पाकिटातच किडे निघत असतील तर मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे म्हसळा शहरात अनेक दुकानांमध्ये एक्सपायरी जवळ आलेला किंवा अयोग्य पद्धतीने साठवलेला माल विकला जातो का, हा सवाल आता उपस्थित होत आहे. मॅगीसारख्या नामांकित कंपनीच्या प्रोडक्टमध्ये असे किडे येत असतील तर अन्न व औषध प्रशासन विभागाने तातडीने दुकाने, गोदामे आणि वितरकांची तपासणी करावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
मॅगी पॅकेटमध्ये जिवंत किडे
