सर्व्हिस रोडअभावी गेला जीव

दिघोडे नाक्यावरील अपघातात एक ठार

| चिरनेर | वार्ताहर |

उरण पूर्व भागातील रस्त्यांना सर्विस रोड नसल्याने सातत्याने अपघात होत असून, त्याचा प्रत्यय मंगळवारी आला आहे. सकाळी मुख्य रस्त्यावरून चालत जाणाऱ्या एका व्यक्तीला भरधाव कंटेनर ट्रेलरने धडक दिल्याने त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. दिघोडे नाक्यावरील वळण हे अवजड कंटेनर वाहतुकीस बंदी असतानादेखील या वळणावरून बेकायदेशीर वाहतूक होत आहे. याला सार्वजनिक बांधकाम खाते, उरण व वाहतूक विभाग यांच्या हलगर्जीपणा कारणीभूत आहे, असा आरोप उरणकरांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, संतप्त जमावाने सुमारे दोन तास दिघोडे नाक्यावर चक्काजाम करीत मयताच्या वारसांना नुकसानभरपाईची मागणी लावून धरली होती. अखेर ज्या कंटेनर ट्रेलरने संबंधित व्यक्तीला धडक दिली, त्या रॉयल कंटेनरच्या मालकाने मयताच्या वारसाला सहा लाख रुपयांची भरपाई देण्याची तयारी दर्शविल्यावर संतप्त जमाव शांत झाला. यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले होते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवापाडा येथील मधुकर अंबाजी घरत (59) यांना रॉयल ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती परिसरातील गावकऱ्यांना मिळताच त्यांनी रस्त्यावर उतरत सुमारे चार तासांचा चक्काजाम केला. यावेळी पोलीस अधिकारीदेखील घटनास्थळी तात्काळ उपस्थित राहिल्याने कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आली नाही. दरम्यान दिघोडे नाक्यावर असलेले वळण अतिशय धोकादायक आहे. त्या ठिकाणी बोर्ड लावण्याचे सौजन्य देखील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कंत्राटदारांनी दाखविलेले नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघातांची भीती आणखीनच वाढली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

Exit mobile version