रायगडच्या किनार्‍यांमुळे स्थानिकांची भरभराट

हक्काच्या रोजगाराने उदरनिर्वाहाचा प्रश्‍न मिटला

| रायगड | प्रतिनिधी |

सुमद्रकिनार्‍यावर वसलेल्या रायगडचे पर्यटन वाढत असून, येथील सुमद्रकिनारे यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. हे किनारे स्थानिकांना रोजगार देत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांची भरभराट झाली असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न कायमचा मिटला आहे. तरी, येथील सुविधांत वाढ केल्यास पर्यटक वाढतील, अशी अपेक्षा पर्यटकांकडूनही व्यक्त होत आहे.

रायगड जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्व आहे. तसेच हा जिल्हा पर्यटनदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. या जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात अलिबाग, सारळ, सासवणे, आवास, किहीम, वरसोली, आक्षी, नागाव, चौल आणि रेवदंडा तसेच मुरुड तालुक्यातील काशिद, मुरुड, आगरदांडा, राजपुरी, तर श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन, हरिहरेश्‍वर, दिवेआगर, शेखाडी, बागमांडला, दिघी येथे समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. या समुद्रकिनार्‍यांवर पाऊस वगळता पर्यटकांची वर्दळ कायम असते. काही वर्षांपूर्वी हे किनारे फारसे गजबजलेले नसायचे; परंतु प्राचीन लेणी, गडकिल्ले, समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्ट्स, धरणे, बंदरे, धबधबे, गिरीस्थाने, अभयारण्य, ऐतिहासिक धार्मिक स्थळे आदी पर्यटनस्थळांवर गर्दी वाढू लागली आहे. स्थानिकांनी लॉजिंग बोर्डिंगसह व्हेज-नॉनव्हेज उपाहारगृहे, बोटिंग, विविध प्रकारची कटलरी सामान, लाँचसेवा, रो-रो सेवा, कोकण फूड बाजार, भेलपुरी, पाणीपुरी, कुल्फी, गोळा व सरबत, नारळ पाणी, ताडगोळे, सुकी मासळी, विविध प्रकारच्या टोप्या, चहा-नाश्ता, लहान मुलांची खेळणी आदी व्यवसाय किनार्‍यांवर सुरू झाल्याने पर्यटकांची सोय होण्याबरोबरच स्थानिकांना बर्‍यापैकी रोजगार उपलब्ध होत आहे.

वर्षभरात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. कोरोना काळात दोन वर्षे शासनाने पर्यटकांना बंदी घातल्याने जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यांसह सर्वच व्यवसाय ठप्प होते. यामुळे येथील व्यावसायिक कर्जबाजारी झाले होते. व्यवसायासाठी विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा हप्त भरणेही कठीण होऊन बसले होते. कामगारांना पगारही देता येत नसल्याने रोजंदारीवर काम करणार्‍यांसह त्यांच्या कुटुंबावरही उपासमारीची वेळ आली होती.

कोरोनाची बंदी उठल्यानंतर पर्यटनवाढीला चालना मिळाली आहे. त्यामुळे व्यवसायाने परत एकदा उभारी घेतली. आर्थिक मंदी व टाळेबंदीमुळे मागील चार वर्षांपासून समुद्रकिनार्‍यावरील गर्दी रोडावली होती. मागील चार महिन्यांत पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आम्हा स्थानिकांना रोजगार मिळाला आहे.

मंदार पावशे,
स्थानिक व्यावसायिक

पर्यटनस्थळांच्या विकासाबरोबरच पर्यटनस्थळांकडे जाणार्‍या रस्त्यांच्या रुंदीकरणाबरोबरच समुद्रकिनारा, धार्मिक पर्यटनस्थळे, ऐतिहासिक पर्यटनस्थळे येथील मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्‍न सोडविल्यास पर्यटकांची संख्या अधिक वाढू शकेल.

भारती पाटील,
पर्यटक
Exit mobile version