अलिबागसह संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी जयंती साजरी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे झुंजार नेते, विधानसभेतील जनसामन्यांचा आवाज, दलित, पीडित, शोषित, कामगार आणि शेतकऱ्यांचे कैवारी, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार खऱ्या अर्थाने जपणारे, 50 वर्षांहून अधिक काळ फौजदारी वकील म्हणून काम केलेले निष्णांत ज्येष्ठ वकील स्व. ॲड. दत्ता पाटील उर्फ दादांची 100 वी जयंती अलिबागसह संपूर्ण जिल्ह्यात साजरी करण्यात आली. त्यांच्या पुतळ्यासह प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनच्यावतीने अलिबागमधील न्यायालयात स्व. ॲड. दत्ता पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष अनंत पाटील, सचिव ॲड. अमित देशमुख, खजिनदार राजेंद्र माळी, अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, ॲड. गौतम पाटील, ॲड. अमित देशमुख, ॲड. जयेश जोशी, ॲड. किशोर हजारे, ॲड. सुयोग बारटक्के, ॲड. के.डी. पाटील, ॲड. समाधान पाटील आदी वकील मंडळी उपस्थित होते. यावेळी ॲड. गौतम पाटील, ॲड. प्रसाद पाटील, ॲड. मानसी म्हात्रे, ॲड. के.डी. पाटील, ॲड. जयेश जोशी यांनी स्व. दत्ता पाटील यांच्या कार्याची महती सांगत असताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
अलिबागमधील शेतकरी भवन येथील सभागृहात स्व. ॲड. दत्ता पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी शेकापच्या राज्य महिला आघाडी प्रमुख, अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, संदीप सारंग, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अलिबागमधील जिल्हा सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयामध्येदेखील दादांची जयंती साजरी करण्यात आली. गौरव प्रमोद पाटील यांच्या हस्ते दादांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष सतीश प्रधान, मयुरी पाटील, आर.के. घरत, हेमंत राऊत, शरद कोरडे, ग्रंथपाल रजिता माळवी, सहाय्यक ग्रंथपाल अमित धुमाळ, लेखनिक अपूर्वा वर्तक, अर्चना माळवी, अंकित म्हात्रे, अभिषेक भगत व इतर वाचक वर्ग उपस्थित होते. यावेळी गौरव पाटील यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला.











