। उरण । वार्ताहर ।
काँग्रेसच्या मंथन शिबिरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या मंथन शिबिरात काँग्रेस पक्षाने काही ठराव पास केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने या भागात उभे रहात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. त्यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना पक्षाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
त्यामुळे या भागात उभारत असलेल्या आंदोलनात लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी गजर सुरू असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अंग काढून घेतले होते. परंतु आज अचानक उलवे नोड परिसरात आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या मंथन शिबिरात काही ठराव पारित करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव पारित करण्यात आला. त्याला उपस्थित सर्वांनी संमती दर्शवित हे ठराव मंत्रालयात मांडण्याचे सूतोवाच केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून येत्या 24 जून रोजी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यावेळी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेते याकडे राजकीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
यावेळी ओबीसी समाजासाठी घेतलेले ठराव पारित होण्यासाठी व त्यामध्ये प्रामुख्याने विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचा नामकरणाचा ठराव यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेतेमंडळी किती पाठपुरावा करण्यासाठी किती प्रयत्न करतात की ठराव कागदावरच राहतात याकडे रायगड काँग्रेसचे लक्ष लागून राहिले आहे. या मंथन शिबिराचे उदघाटन अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजयसिंग यादव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे, तारीक अन्वर, मुकुल वासनिक, के राजू, बाळासाहेब थोरात, सुनिल केदार, विजय वडेट्टीवर, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, नितीन राऊत, आदी मंत्री उपस्थित होते.