| पनवेल | वार्ताहर |
अनोळखी नंबरवरुन आलेल्या लिंकवर क्लिक करणे खारघरमधील ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले आहे. या ज्येष्ठ नागरिकाने ज्या लिंकवर क्लिक केले, त्या लिंकच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून 3.51 लाखांची खरेदी करुन त्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. खारघर पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार संजीव पानसे (67) खारघर, सेक्टर-5 मध्ये राहण्यास आहेत. पानसे घरी असताना, त्यांच्या मोबाईलवर सायबर चोरट्यांनी मेसेज पाठवून अॅक्सीस बँकेकडून त्यांना 8970 रिवार्ड मिळाल्याचे आणि त्याची मुदत आज संपत असल्याचे तसेच सदर रिवॉर्ड मिळवण्यास दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगण्यात आले होते. सदरचा मेसेज अक्सीस बँकेकडून पाठविण्यात आला असावा, असे वाटल्याने पानसे यांनी मेसेजमधील सूचनेप्रमाणे लिंकवर क्लिक केले. त्यांनतर काही वेळातच सायबर चोरट्यांनी पानसे यांच्याकडून घेतलेल्या माहितीचा वापर करुन आर्थिक व्यवहार करण्यास सुरुवात केली. याबाबतचे आलेले ओटीपी पानसे यांनी त्यात टाकले. याचवेळी त्यांच्या खात्यातून 1.53 लाख रुपये तर त्यांच्या पत्नीच्या खात्यातून 1.98 लाख रुपये डेबीट झाल्याचे मेसेज त्यांना आले. त्यानंतर पानसे दाम्पत्याने बँकेत जाऊन चौकशी केली असता, त्यांच्या खात्यातून 3.51 लाख रुपयांची रक्कम सायबर चोरट्यांनी काढल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.